म्हणून राहुल गांधींनी सुषमा स्वराज यांचे मानले आभार
संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. यानंतर सुषमा स्वराज यांचं सोशल मीडियात कौतुक होत असतानाच आता राहुल गांधींनीही सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. यानंतर सुषमा स्वराज यांचं सोशल मीडियात कौतुक होत असतानाच आता राहुल गांधींनीही सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.
सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. दहशतवादी संघटना, जिहादी आणि दहशतवादी तयार केलेत. तर भारताने वैज्ञानिक, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ घडवले असेही सुषमा स्वराज यांनी म्हटले.
सुषमा स्वराज यांनी केलेल्या या सडेतोड भाषणाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. इतकेच नाही तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करत सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्यांनी यामध्येही एक वेगळा अँगल शोधला आहे.
राहुल गांधींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "सुषमाजी, स्वातंत्र्यानंतर आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या संस्था उभ्या केल्या. काँग्रेस सरकारचं व्हिजन आणि कामं मान्य केल्या बद्दल धन्यवाद."
राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडियात अनेक प्रतिक्रिया उमटत असल्याचं पहायला मिळत आहेत.
सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, "आज मी पाकिस्तानच्या नेत्यांना सांगू इच्छिते की भारत आणि पाकिस्तान एकाच वेळेस स्वतंत्र झाले. भारताने जगभरात आपली एक ओळख निर्माण केली. मात्र, पाकिस्तानने आपली ओळख केवळ दहशतवादी देश म्हणून केली आहे."