...म्हणून घटस्फोट घेतल्यानंतर त्याने पत्नीचे केले कन्यादान!
सध्या एक विशेष लग्न चर्चेत आहे.
ग्वालियर : सध्या एक विशेष लग्न चर्चेत आहे. या लग्नाची खासियत म्हणजे पतीनेच आपल्या पूर्व पत्नीचे कन्यादान केले. त्याचे झाले असे...
दिल्लीत एका व्यावसायिकाने एका मुलीशी लग्न केले. मात्र काही कौटुंबिक कारणाने त्याने तिच्यापासून घटस्फोट घेतला आणि दुसरे लग्न केले. यानंतर त्याने आपल्या पूर्व पत्नीचे फक्त लग्न करून दिले नाही तर कन्यादानही केले. हे अनोखे लग्न वसंत पंचमीच्या दिवशी हरिद्वार येथे झाले.
म्हणून घेतला घटस्फोट...
लग्नची ही गोष्ट पूर्णपणे फिल्मी आहे. चार वर्षांपूर्वी दिल्लीत राहणाऱ्या गौतम नावाच्या एका व्यावसायिकाने ग्वालियर येथील एका मुलीशी लग्न केले. मात्र त्या तरूणीची मॉडर्न विचारसरणी सासरच्यांना पटली नाही. काहीच दिवसात घरात भांडणं होऊ लागली. हे प्रकरण इतके गंभीर झाले की, घरच्यांच्या सुखासाठी गौतमने तिला घटस्फोट दिला. मात्र तिच्यावरचे प्रेम काही केल्या कमी झाले नाही. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. काही दिवसांनी गौतमने कुटुंबियांच्या पसंतीच्या एका मुलीशी लग्न केले.
दुसरे लग्न करण्यासाठी तयार केले
गौतमने आपल्या पूर्व पत्नीला समजवून कसेबसे दुसऱ्या लग्नासाठी मनवले. आणि तिला लग्नासाठी मदतही केली. गौतमने सांगितले की त्याची पूर्व पत्नी ऋषिकेशमध्ये आयोजित एका यज्ञात यजमान म्हणून सहभागी झाली होती. तिथेच महाराजांना दुसऱ्या विवाहाबद्दल विचारले. त्यांनी दुसऱ्या लग्नासाठी आशीर्वाद दिला.
पूर्व पत्नीचे कन्यादान केले
याचदरम्यान तिची ओळख मुंबईतील एका तरुणाशी झाली. तो मुळचा कोलकत्ताचा आहे. तो एका मीडिया संस्थेत काम करतो. त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवताच वसंत पंचमीचा मुहुर्त साधत दोघे विवाहबद्ध झाले. गौरवने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या उपस्थितीत पूर्व पत्नीचे कन्यादान केले.