1 जुलैपासून होणाऱ्या मोठ्या बदलांमुळे तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, जाणून घ्या
जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून दैनंदिन व्यवहाराशी संबंधित काही मोठे बदल होणार आहेत.
Big Changes From 1 July: जुलै महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून दैनंदिन व्यवहाराशी संबंधित काही मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. ट्रेडिंग खातं, आधार-पॅन कार्ड लिंक, क्रिप्टोकरन्सी नियमांमध्ये बदल होणार असल्याने तुमच्यावर आर्थिक बोजा वाढू शकतो.
शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमचे ट्रेडिंग खात्याची केवायसी करा. 30 जूनपर्यंत केवायसी पूर्ण करा अन्यथा तुमचे खाते तात्पुरते बंद केले जाऊ शकते. असे झाल्यास तुम्ही शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. पॅनल्टीसह आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे. यापूर्वी विना दंड आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती. 30 जूनपर्यंत तुम्हाला 500 रुपये दंड भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला दुप्पट नुकसान भोगावे लागू शकते. 30 जूननंतर 1000 रुपये दंड भरावा लागेल.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 1 जुलैपासून मोठा बदल होत आहे. वास्तविक, 30 टक्के करानंतर या लोकांना आणखी एक मोठा झटका बसणार आहे. क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना 1 टक्के टीडीएस भरावा लागेल. तसेच तुमचे नुकसान होत असले तरीही तुम्हाला टीडीएस भरावा लागेल.