मुलाने विचारलं माझे वडिल कोण आहेत? आईने सांगितली 27 वर्षांपूर्वीची बलात्काराची `ती` दुर्देवी घटना
एका महिलेने तब्बल 27 वर्षांनंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत खुलासा केला आहे.
लखनऊ : लहान वयात झालेल्या बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या एका महिलेने तब्बल 27 वर्षांनंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत खुलासा केला आहे. बलात्कारामुळे झालेल्या मुलाने त्याच्या आईला, माझे वडील कोण आहेत?, हे विचारलं मात्र तिने उत्तर देणं टाळल्यावर मुलाने मी आत्महत्या करेल, अशी धमकीच दिली. त्यामुळे आईने तिच्यावरची आपबिती सांगितली. ही घटना उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर इथली आहे.
अविवाहित आईने सांगितली 27 वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचाराची गोष्ट-
मी माझ्या बहिणीकडे शिक्षणासाठी गेले होते तेव्हा मी 12 वर्षांची होते. माझी बहिण शाळेत शिक्षिका होती. माझे दाजी आणि बहिण घरातून बाहेर गेल्यावर दोन मुलांनी घरात घुसून माझ्यावर बलात्कार केला आणि जर मी कोणाला याबाबत बोलले तर माझ्या दीदीला आणि दाजींना मारून टाकण्याची धमकी दिली. काही दिवसांनी माझी तब्येत बिघडू लागली. डॉक्टरांना दाखवल्यावर गर्भधारणा झाल्याचं समजलं.
माझ्या घरच्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला मात्र माझं वय कमी असल्यामुळे डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. मला जबरदस्तीने बाळाला जन्म द्यावा लागला. माझ्या दाजींनी दोन्ही मुलांच्या घरी तक्रार केली तर त्यांना मारहाण केली. त्रासाला कंटाळून माझ्या बहिणीने तिचं ट्रान्सफर रामपूरला करून घेतलं. माझ्या मुलाला मी तिकडेच जन्म दिला मात्र माझ्या आईने मलाही ते बाळ न दाखवता आमच्या नातेवाईकांमध्ये दिलं होतं.
2000 साली मला सर्व विसरून जायला सांगत माझं लग्न लावलं. लग्नानंतर मी एका मुलालाही जन्म दिला मात्र काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला माझ्या भूतकाळाबाबत सर्व समजलं. माझ्या चारित्र्यावर त्याने बोटे दाखवली, रोज भांडणं या त्रासाला कंटाळून मी लग्नानंतर झालेल्या मुलाला घेऊन लखनऊला आले.
माझ्या मुलाला ज्यांनी दत्तक घेतलं होतं त्यालाही तिथले लोकं त्रास देत होते. ज्यांना माझं मूल दिलं होतं त्यांना माझ्याबद्दल सर्व माहिती होती. त्यालाही जेव्हा सर्व प्रकार समजला तेव्हा तो माझ्याकडे निघून आला. तो मला त्याच्या वडिलांबद्दल विचारू लागला. तो लहान असल्यामुळे त्याला उत्तर देणं टाळायचे.
मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने मला हाच प्रश्न केला की, माझे वडील कोण आहेत सांग?, तेव्हाही मी उत्तर देणं टाळलं, मात्र तो संतापला आणि म्हणाला मला आज सांग नाहीतर मी माझ्या जिवाचं बरं-वाईट करून घेईल. त्यावेळी त्याला मी सर्व गोष्ट सांगितली.
तू आयुष्यात जी शिक्षा भोगली आहेस ती शिक्षा आता इतरांना द्यायची आहे. ज्यांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ते शांतपणे जगत आहेत. मी तुझ्या बरोबर आहे.आपण त्यांना शिक्षा करू, असं म्हणत माझा मुलगा माझ्या बाजुने उभा राहिला. त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले.
एक दोन नाही तर हे प्रकरण पूर्ण 27 वर्षांचं आहे. त्यामुळे पुरावे कसे जमा करणार?, असे प्रश्न पोलिसांनी केले होते. त्यामुळे माझी तक्रारही नोंदवली गेली नाही. पण जेव्हा कोर्टात अर्ज दाखल झाला, तेव्हा 4 मार्च 2021 रोजी एफआयआर दाखल झाला, तेव्हा पोलिसांनी मला पूर्ण पाठिंबा दिला.
दरम्यान, दोन आरोपी भावांमधील एका भावाला पोलिसांनी अटक केली आहे. तर ज्या भावाचा डीएनए मॅच झाला तो अद्याप फरार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.