वायू प्रदूषणामुळे या शहरात होताहेत सर्वाधिक मृत्यू
वायू प्रदूषणामुळं तब्बल १२ हजार निष्पाप लोकांना जीवास मुकावं लागलं आहे.
बंगळुरू : संपूर्ण भारताला वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. मात्र, भारतातील एक शहर असे आहे की जेथे ही वायू प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर आहे. या शहरातील लोकांना प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण होत आहे. इतकेच नव्हे तर कोरोनापूर्वीच त्यांना मास्क घालून घराबाहेर पडावे लागत होते.
भारतातील सर्वधिक वायू प्रदूषण असणारं हे शहर आहे बंगळुरू. या शहरात २०२० साली वायू प्रदूषणामुळं तब्बल १२ हजार निष्पाप लोकांना जीवास मुकावं लागलं आहे. ग्रीनपीस इंडिया संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातुन हि माहिती उघड झालीय.
बंगळुरू शहराच्या 10 ठिकाणच्या हवेच्या गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवरून पीएम-2.5 आणि पीएम-10 च्या वार्षिक सरासरीच्या आधारे नमुने घेण्यात आले होते. त्याची चाचणी केली असता या सर्व ठिकाणच्या वायू प्रदूषणाची पातळी WHO च्या मानकांपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं.
या अहवालात देशातील सर्व शहरे प्रदूषित आहेत. 80 टक्क्यांहून अधिक शहरे आणि शहरांमध्ये PM-10 पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, असं म्हटलं आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 0-50 असतो तेव्हा तो 'चांगल्या' श्रेणीत, 51-100 'समाधानकारक', 101-200 'मध्यम', 201-300 'गरीब', 301-400 'अत्यंत गरीब' 400-500 हा 'गंभीर' मानला जातो आणि 500 पेक्षा जास्त हवा गुणवत्ता निर्देशांक 'अत्यंत गंभीर' मानला जातो.