नवी दिल्ली : निर्भयाच्या दोषींना 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींविरोधात पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी जवळपास एक तास चाललेल्या सुनावणी नंतर फाशीची शिक्षा सुनावली आहे. निर्भयाच्या दोषींना आतातरी फाशी होईल का अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे. दोषींच्या वकिलांनी अजून काही पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी वकिलांनी म्हटलं की, 'अक्षय, विनय आणि मुकेश यांची दया याचिका फेटाळली गेली आहे. पण पवनकडून अजून दया याचिका आणि क्यूरेटिव पिटिशन दाखल होणं बाकी आहे. हायकोर्टाने दिलेला एक आठवड्याची वेळ 11 फेब्रवारीला संपली आहे. या प्रकरणातील दोषींवर इतर कोणत्याही कोर्टात कोणतीही याचिका प्रलंबित नाही. त्यामुळे नव्याने डेथ वॉरंट काढलं जावू शकतं.'



दोषींचे वकील एपी सिंह यांनी म्हटलं की, 'आम्ही पुन्हा अक्षयची दया याचिका करु इच्छितो. काही कागदपत्र जोडायचे राहून गेले होते. अक्षयच्या आई-वडिलांनी दया याचिकेत अपूर्ण कागदपत्र लावले होते. जर कोर्टाने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही आज अक्षयची स्वाक्षरी घेऊन पुन्हा दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवू इच्छितो.' दोषी पवनचे वकील रवि काजी यांनी कोर्टाला सांगितलं की, 'पवन देखील क्यूरेटिव आणि दया याचिका करु इच्छित आहे.'


याआधी 2 वेळा निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी झाले आहेत.  


विनय शर्माच्या वकिलांनी म्हटलं की, विनय हा मानसिकरित्या अस्थिर आहे. पण सुप्रीम कोर्टाने विनयची मेडिकल रिपोर्ट पाहिल्यानंतर ही गोष्ट फेटाळून लावली आहे. सध्या गोषींकडे बचावासाठी कोणतेच पर्याय राहिलेले नाहीत. फक्त दोषी पवनकडे दया याचिका करण्याचा पर्याय आहे.