खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दाखवला `द केरला स्टोरी` चित्रपट; त्यानंतरही तरुणीने युसूफसोबत काढला पळ
The Kerala Story : प्रदर्शनापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. भाजपशासित अनेक राज्यात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या मोफत शोचे देखील आयोजन केले होते. अशातच आता मध्य प्रदेशातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.
The Kerala Story : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. चार महिलांवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे ज्यांचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करून त्यांना दहशतवादी संघटने मध्ये सामील केले जाते. अनेक राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. दुसरीकडे मात्र देशभरात बऱ्याच ठिकाणी काही राजकीय तसेच सामाजिक संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात आले होते. भाजप (BJP) खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनीही या चित्रपटाच्या शोचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी एका तरुणीला हा चित्रपट दाखवला होता. मात्र आता या तरुणीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मध्य प्रदेशची (MP News) राजधानी भोपाळमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमध्ये एका हिंदू मुलीने युसूफ नावाच्या मुलाशी लग्न केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच या मुलीला भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता आणि तिला 'द केरला स्टोरी' हा चित्रपटही दाखवला होता. पण मुलीने आपला विचार बदलला नाही आणि तिने युसूफसोबत विवाह केल्याचे काही माध्यमांनी म्हटलं आहे. मात्र याबाबत स्पष्ट अशी माहिती समोर आलेली नाही.
19 वर्षीय तरुणी ही नर्सिंगचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, घराशेजारी राहणाऱ्या युसूफ नावाच्या तरुणाने तिची फसवणूक करुन तिला पळवून नेले आहे. तरुणीचे 30 मे रोजी लग्न होणार होते, मात्र त्याआधीच दागिने आणि रोख रक्कम घेऊन तिने घर सोडले होते. त्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युसूफसोबत तिने विवाह केला. युसूफने तरुणीच्या नावावर बँकेतून कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते मात्र ती तरुणी भरत होती. सांगून ऐकत नसल्याने शेवटी मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीला पोलीस ठाण्यात बोलवून घेतलं आणि झाल्या प्रकाराबाबत विचारणा केली. यावेळी तरुणीने युसूफसोबत स्वत:च्या इच्छेने राहत असल्याचे म्हटले. धक्कादायक बाब म्हणजे युसूफवर यापूर्वीच अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल असून तो या भागातील सराईत गुन्हेगार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्वतः युसूफसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केलेल्या विद्यार्थिनीला समजावून सांगितले होते. एवढेच नाही तर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी विद्यार्थीनीला 'द केरला स्टोरी' हा प्रसिद्ध चित्रपट पाहण्यासाठी नेले होते. मात्र त्यानंतरही तिने आपले मत बदलले नाही आणि ती युसूफसोबत गेली. दुसरीकडे या चित्रपटाचे कौतुक करताना प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते की, हा चित्रपट देशातील मुलींविरोधातील कटाचा पर्दाफाश करत आहे. वास्तव दाखवणाऱ्या या चित्रपटात एक घृणास्पद षडयंत्र दाखवण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात चित्रपट करमुक्त केल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले होते