नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तुमचे नाव राहुल जिन्ना असायला पाहिजे होते, अशी टीका भाजप प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार जीव्हीएल नरसिम्हा यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रेप इन इंडिया' अशी टिप्पणी केल्यामुळे राहुल गांधी यांनी वाढ ओढावून घेतला होता. या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी शुक्रवारी भाजपकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील रामलीला मैदानावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपला चांगले फटकारले. एखादी सत्य गोष्ट बोलण्यासाठी मी किंवा काँग्रेसचा कोणताही नेता माफी मागणार नाही. तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला होता. 


'माफी मागायला मी काही राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी आहे'



त्यामुळे भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राहुल गांधींवर सडकून टीका केली. तर खासदार जीव्हीएल नरसिम्हा यांनीही राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले. तुम्हाला राहुल जिन्ना हे नाव शोभून दिसेल. मुस्लिमांचे लांगुलचालन आणि तुमची मानसिकता पाहता तुम्ही सावरकर नव्हे तर मोहम्मद अली जिन्ना यांचे वारसदार ठरता, असे जीव्हीएल नरसिम्हा यांनी सांगितले. 



तर गिरीराज सिंह यांनीही राहुल यांच्यावर उधारीचे आडनाव घेऊन कोणी गांधी होत नाही, अशी बोचरी टीका केली. देशभक्त होण्यासाठी धमन्यांमध्ये शिद्ध हिंदुस्तानी रक्त हवे. वेश बदलून अनेकांनी देशाला लुटले आहे, आता हे होणार नाही. हे तीन जण कोण आहेत? हे देशाचे सर्वसामान्य नागरिक आहेत का?, असा सवाल गिरीराज सिंह यांनी गांधी कुटुंबाचा फोटो शेअर करत विचारला.