लखनऊ : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकानं एकत्रितपणे ही कारवाई करत, उत्तरप्रदेशमधल्या बिजनौरमधून कादिर अहमद याला ताब्यात घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिजनौरमधील नजीजाबाद येथून कादिर अहमदला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कादिर अहमदला टाडा न्यायालयाने आधीच दोषी ठरवले आहे. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेसाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात कादिर अहमदचा सहभाग असल्याचा आरोप आहे.


मुंबई बॉम्बस्फोटासाठी टायगर मेमनद्वारे जामनगर इथे शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं पुरवण्यात आली, त्यात कादिर अहमद याचाही सहभाग होता असं उघडकीस आलंय. कादिर अहमदची चौकशी सुरु असून त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येईल आणि नंतर गुजरातला पाठवलं जाईल, असं दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अरुण असीम यांनी सांगितलं.