ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता; ICU बेड्सची व्यवस्था करण्याची सूचना
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असाताना तिसऱ्या लाटेचे संकेत
मुंबई : गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने अद्यापही भारतीयांची साथ सोडलेली नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सतत तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. शिवाय कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याचा इशारा नीती आयोगाने केंद्राला दिला आहे.
ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लहान मुलांना तिस-या लाटेचा तडाखा बसणार असल्याचं निती आयोगाने सांगितलं आहे. त्यामुळे किमान 2 लाख ICU बेड्सची व्यवस्था करण्याची सूचना निती आयोगाने केंद्राला दिली आहे. सध्या देशात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी साखळी तोडण्यासाठी खबरदारी बाळगायला हवी.
कोरोना रोखण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्येचं सांगितलं जात आहे. पण लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद आहेत. केंद्र सरकारकडून कोरोना लसीचा अपुरा साठा, त्यामुळे आठवड्यातील दोन ते चार दिवस लसीकरण बंद अशा सर्व परिस्थितीतून मार्ग काढत मुंबई महापालिकेने लसीकरणात आघाडी कायम ठेवली आहे.
मुंबईत शनिवारी 2 लाख 58 हजार 288 लोकांचे लसीकरण करण्यात आली आहे. दरम्यान, पहिला डोस घेणाऱ्या मुंबईकरांची संख्या 63 लाख 40 हजार 138 वर पोहोचली आहे, तर दुसरा डोस घेणाऱयांची संख्या 21 लाख 61 हजार 939 वर पोहोचली आहे. शनिवारी राज्यात 11 लाख लोकांचे लसीकरण झाले. त्यातील अडीच लाख लोक हे एकट्या मुंबईतील आहेत.
विशेष लसीकरणातून दिवसाला 250 ते 500 लसीकरण केले जात आहे. विशेष लसीकरणातून आतापर्यंत परदेशी शिक्षण, नोकरीसाठी जाणाऱ्या 23 हजार 484 जणांचे, शारीरिक आणि मानसिक आजार असलेल्या 2 हजार 377, कोणतेही ओळखपत्र नसलेल्या 2 हजार 96 कैदी, वंचित-उपेक्षित आणि तृतीयपंथीयांचे तर अंथरुणाला खिळलेल्या 2 हजार 525 जणांचे लसीकरण पालिकेने केले आहे.