मोदी आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक; भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
भाजपाच्या पहिल्या यादीत १७ ते १८ उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केलेले असताना भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत. ११ एप्रिलला होत असलेल्या ९१ जागांवरील उमेदवारांची या यादीत बहुतांशी नावे असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या विदर्भासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम या राज्यात निवडणूक होत आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत १७ ते १८ उमेदवारांचा समावेश असेल असे सांगितले जात आहे. २०१४ साली निवडून आलेल्या उमेदवारांपैकी पाच ते सहा जणांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा पक्षात आहे. काही ठिकाणी भाजपा खासदारांबाबत नाराजी असल्याने अशा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात जे खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुणाचा पत्ता कापला जाणार आणि कुणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप खासदारांचा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेनुसार ज्यांचे नाव डेंजर झोनमध्ये आहे त्या भाजप खासदाराला उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतून किरीट सोमय्या आणि पूमन महाजन यांच्या उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता आहे. पहिल्या यादीत जास्तीत जास्त उमेदवारांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष आजच्या यादीकडे लागले आहे.