Wrestlers Protest : `...तर मी स्वतः फाशी घेईन`, ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून आरोपाचं खंडन!
Wrestlers Protest : मी 4 महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकतोय. पहिल्या दिवशीही मी म्हटलं होतं की, एकही आरोप सिद्ध झाला तर मी फाशी घेईन, असं ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांनी म्हटलं आहे.
Brij Bhushan Sharan Singh : अखिल भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांच्यावर प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) आणि इतर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिकसारख्या मल्लांचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर (Jantar Mantar Protest) आंदोलन सुरू आहे. अशातच ब्रिजभूषण सिंग यांनी आरोपाचं खंडन केलंय.
काय म्हणाले ब्रिजभूषण सिंग?
गेल्या 12 वर्षांत मी एकाही मुलीला चुकीच्या पद्धतीनं पाहिलेलं नाही, असं ब्रिजभूषण सिंग म्हणाले आहेत. पैलवान असलेल्या कोणत्याही मुलीला हे आरोप खरे आहेत का?, असं विचारलं पाहिजं, असंही त्यांनी म्हटलंय. मी 4 महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकतोय. पहिल्या दिवशीही मी म्हटलं होतं की, एकही आरोप सिद्ध झाला तर मी फाशी घेईन, असं ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांनी म्हटलं आहे.
सध्या दिल्ली पोलीस (Delhi Police) या प्रकरणाची चौकशी करत असल्याने यावर मी जास्त बोलू शकत नाही. या प्रकरणावर कुस्तीपटूंना पुरावे द्यायला सांगावं, चौकशीचा अहवाल येईल तेव्हा पैलवानांना पाठिंबा देणाऱ्यांना पश्चाताप करावा लागेल, असं वक्तव्य करत ब्रिजभूषण सिंह यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण प्रकरणी दिल्ली पोलिस त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलीये. भाजपचे बृजभूषण सिंह हे 3 वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेले आहेत. राम मंदिर आंदोलनापासून त्यांचा राजकारणात दबदबा आहे. मैनपुरी, रामपूर, आजमगड, रायबरेली या जिल्ह्यांवर ब्रिजभूषण सिंह यांचं वर्चस्व असल्याने भाजप कारवाई करत नसल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केलाय.