तामिळनाडू : कुरांगनी जंगलाला आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी रूग्णालयाला मंगळवारी भेट देऊ जखमींची विचारपूस केली.
चेन्नई : तामिळनाडूतील कुरांगनी येथील जंगलाला लागलेल्या आगीत मृत्यू पावलेल्यांचा आकडा ११वर पोहोचला आहे. या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या एका महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या या महिलेचे नाव दिव्या असून ती २९ वर्षांची होती. तिच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू होते.
नवविवाहितांचा होरपळून मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, दिव्या ही आपला पती विवेक याच्यासोबत कुरांगनी जंगलात ट्रेकिंगसाठी गेली होती. मात्र, जंगलाला अचानक लागलेल्या आगीत विवेकचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर, दिव्या ही गंभीररित्या भाजली होती. दिव्या आणि तिचा पती असे दोघेही नवविवाहीत होते. त्यांनी याच वर्षी लग्न केल होते.
राज्यपालांनी केली जखमींची विचारपूस
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ३६ लोकांचा एक गट कुरांगनी जंगलात ट्रेकिंगसाठी गेला होता. दरम्यान, जंगलाला अचानाक आग लागली. ज्यात हे सर्व लोक अडकले. यातील ९ जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर, इतर जण गंभीररित्या भाजले गेले. ही घटना रविवारी घडली. दरम्यान, सर्व जखमींना तामिळनाडूतील मदुराई येथील सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी रूग्णालयाला मंगळवारी भेट देऊ जखमींची विचारपूस केली.