नवी दिल्ली: चीनप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झालीच नाही, असा महत्त्वाचा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी आपण नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचा दावा नुकताच केला होता. मोदी चीनबाबत चांगल्या मूडमध्ये नसल्याचे त्यांच्या एकंदरित बोलण्यावरून वाटत होते, अशी टिप्पणीही ट्रम्प यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी हे दोन्ही नेते ४ एप्रिल २०२० रोजी एकमेकांशी Hydroxychloroquine च्या संदर्भात बोलले होते. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही, असेही MEA ने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनबाबत मोदी सध्या 'चांगल्या मूड'मध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प

तसेच सीमावादाच्या मुद्द्यासंदर्भात भारत चीनशी सैन्यदल आणि दूतावासाच्या पातळीवर थेट बोलणी करत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. आम्ही याच मार्गाने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी दोन्ही देशांचे फिल्ड कमांडर्स प्रत्यक्ष भूमीवर चर्चा करत आहेत, अशी माहिती परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली होती. 


#ChinaIndiaFaceoff : मोदी सरकारच्या मौनामुळे नसत्या कुशंका निर्माण झाल्यात- राहुल गांधी

त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भात भाष्य केले होते. सध्याच्या घडीला भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. १.४ अब्ज इतकी लोकसंख्या असणाऱ्या या दोन्ही राष्ट्रांचं सैन्यबळ कमालीचं आहे. पंतप्रधान मोदी चीनबाबत सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत. मात्र, आपण भारत आणि चीन यांच्यातील वादात मध्यस्थी करायला तयार आहोत, असे ट्रम्प यांनी सांगितले होते.