नवी दिल्ली : आजारांतून वाचवणाऱ्या डॉक्टरांना आपण अनेकदा देवाचा दर्जा देतो. पण सध्या डॉक्टरांकडून आकारण्यात येणारी भरमसाट फी गरिबांना परवडणारी नाही. एकीकडे डॉक्टरांची फी देताना बेजार झालेला रुग्ण असतानाच दुसरीकडे मात्र असा डॉक्टर आहे जो गरिबांसाठी वरदानच ठरत आहे. गेल्या ५० वर्षांपासून हे डॉक्टर अतिशय कमी पैशांत रुग्णांची सेवा करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील बेलगावी जिल्ह्यातील डॉ. बाली, 'हत्ता रुपई डॉक्टर' या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांना संयम, धैर्य, कामाच्या उत्तम दर्जासाठी ओळखलं जातं. त्यामुळे अनेक रुग्ण मोठ्या संख्येने डॉ. बालींकडे येताना दिसतात. गेल्या ५० वर्षांपासून ईएनटी (ENT) अर्थात कान-नाक-घसा स्पेशलिस्ट डॉ. अनप्पा एन.बाली त्यांच्या तीन जणांच्या टीमच्या मदतीने दररोज शहरातील आणि आजूबाजू्च्या गावातून येणाऱ्या ८० ते १०० रुग्णांना तपासतात. 


विशेष बाब म्हणजे रुग्णांकडून ते केवळ १० रुपये फी घेतात. हे १० रुपये त्यांची रुग्णाला तपासणीची आणि औषधांची फी आहे. जर एखादा रुग्ण ही फी देऊ शकत नसेल तर त्या रुग्णावर ते मोफत उपचार करतात.


सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते दवाखाना सुरु करतात जो संध्याकाळी साडे सहाला बंद होतो. पुन्हा एका विश्रांतीनंतर संध्याकाळी ८ वाजता एक-दोन तासांसाठी दवाखाना सुरु करतात. कितीही उशिर झाला, कितीही रुग्ण असले तरीही ते जास्त वेळ थांबून रुग्णांना तपासतात. मजूरांपासून ते घरकाम करणाऱ्यांपर्यंत सर्वच गरीब लोक त्यांच्याकडे येतात.


७९ वर्षीय डॉ. बाली यांनी, ते आधी रुग्णांकडून ७ रुपये फी घेत असल्याचं सांगितलं. पण लोकांना सुट्टे पैसे परत देताना समस्या होत असल्याने १० रुपये फी केल्याचंही ते म्हणाले. 


एक चांगलं काम केल्याने दुसऱ्या चांगल्या कामाची सुरुवात होत असल्याचं डॉ. बालींचं म्हणणं आहे. त्यांच्या आई-वडिलांनी आर्थिक समस्यांचा सामना केला असून शिक्षणासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. 'मी गरिबी पाहिली आहे. अगदी साध्या औषधांसाठीही पैसे जमवताना काय स्थिती असायची हे मला माहितीये' असं ते म्हणाले.


'जर मी रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले तर ते आपल्या आरोग्याविषयी गंभीरतेने विचार करणार नाही. रुग्ण ज्यावेळी पैसे भरणार त्याचवेळी ते औषधं योग्यप्रकारे घेणार असल्याचं' डॉ. बाली यांनी फीबाबत बोलताना सांगितलं.