पेट्रोल पंपावर तुम्हाला मोफत मिळतात या सुविधा
पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता. पण याच पेट्रोलपंपावर आपल्यासाठी अनेक सुविधा देण्यात येतात आणि त्या सुविधा तुम्ही हव्या तेव्हा घेऊ शकता. चला तर मग पाहूयात कुठल्या आहेत या सुविधा?...
मुंबई : पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता. पण याच पेट्रोलपंपावर आपल्यासाठी अनेक सुविधा देण्यात येतात आणि त्या सुविधा तुम्ही हव्या तेव्हा घेऊ शकता. चला तर मग पाहूयात कुठल्या आहेत या सुविधा?...
इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमसोबतच सर्व तेल कंपन्यांनी या सुविधांसंदर्भात एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पेट्रोल पंपावर तुम्हाला मिळणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला या सुविधा पेट्रोल पंपावर मिळाल्या नाहीत तर तुम्ही त्याची तक्रारही करु शकता.
या सुविधा दोन विभागात वाटल्या गेल्या आहेत. पहिल्या भागात अशा सुविधा आहेत ज्या पेट्रोल पंपावर देणं जरुरी आहे आणि दुसऱ्या भागात अशा सुविधा आहेत ज्या देण्याचा संदर्भातील निर्णय पेट्रोलपंप चालकांवर असतो.
मोफत हवा:
अनिवार्य सुविधांचा विचार केला तर यामध्ये सर्वप्रथम येते हवा. ज्यावेळी तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता त्यावेळी तुम्ही गाडीत मोफत हवा भरु शकता. पेट्रोल पंप चालकांना अशी सुविधा तुमच्यासाठी करायची असते.
पाण्याची व्यवस्था :
प्रत्येक पेट्रोल पंपावर पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रवासा दरम्यान तुम्ही पेट्रोल पंपावर पाणी घेऊ शकता.
तक्रार पुस्तिका:
पेट्रोल पंपावर तक्रार बुक असणं गरजेचं आहे. जर पेट्रोल पंपावर एखाद्या कर्मचाऱ्यासंदर्भात किंवा सुविधेसंदर्भात तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही त्या नोंदवहीत करु शकता.
काम करण्याची वेळ:
पेट्रोल पंपावर किती तास काम केलं जातं याची माहितीही प्रमुख रुपात डिस्प्ले करणं आवश्यक आहे. त्यासोबतच कंपनीच्या अधिकाऱ्यांचा फोन नंबरही असणं आवश्यक आहे. म्हणजेच गरज पडल्यास ग्राहक त्या क्रमांकावर संपर्क करु शकतील.
फर्स्ट एड बॉक्स:
तुम्हाला प्रत्येक पेट्रोल पंपावर फर्स्ट एड बॉक्स मिळेल. प्रवासादरम्यान तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या फर्स्ट एड बॉक्सच्या मदतीने प्रथमोपचार करु शकता.
शौचालय आणि सुरक्षा:
पेट्रोल पंपावर शौचालयाची सुविधा असणं आवश्यक आहे. इतकेच नाही तर, एखाद्या संकटाच्या काळात परिस्थिती हाताळता यावी यासाठी पेट्रोल पंपावर सुरक्षेची सुविधा आवश्यक असावी.
आता आपण अशा सुविधा पाहूयात ज्या द्यायच्या कि नाही याचा संपूर्ण अधिकार पेट्रोल पंप चालकांवर अवलंबून असतो. तसेच या सुविधा मिळाव्यात यासाठी तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही. यामध्ये समावेश आहे तो म्हणजे वॉटर कुलर, स्नॅक बार, ढाबा, विश्रामगृह, ट्रक ड्रायव्हरसाठी वॉशरुम, पेट्रोल पंपावर टेलिफोनची सुविधा, एटीएम, गॅरेज यांचा समावेश आहे.