Coronavirus: ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे, थकून चालणार नाही- मोदी
युद्धाच्या काळात आपल्या माता-भगिनींनी देशकार्यसाठी स्वत:चे दागिने देऊ केले होते. आताची परिस्थितीही युद्धापेक्षा वेगळी नाही.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) आपल्याला दीर्घकाळ लढाई सुरु ठेवावी लागणार आहे. या लढाईत आपल्याला थांबून किंवा थकून चालणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते सोमवारी भाजपच्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त बोलत होते.
यावेळी मोदींनी म्हटले की, कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपल्याला विजयी व्हायचे आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील नागरीक अभूतपूर्व समज दाखवत आहेत. भारतासारख्या मोठ्या देशात लोक इतक्या आज्ञाधारकपणे वागतील, असे कोणाला वाटलेही नसेल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचे हे प्रयत्न आदर्श ठरत आहेत. भारताने वेळीच कोरोनाचे गांभीर्य ओळखून पावले उचलली. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याबद्दल भारताचे कौतुक केल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
'दिल्लीच्या मरकजवरुन देशात धार्मिक राजकारणाचा प्रयत्न'
यावेळी नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदतीचे आवाहनही केले. यापूर्वी युद्धाच्या काळात आपल्या माता-भगिनींनी देशकार्यसाठी स्वत:चे दागिने देऊ केले होते. आताची परिस्थितीही युद्धापेक्षा वेगळी नाही. हे मानवजातीला वाचवण्यासाठीचे युद्ध आहे. त्यामुळे भाजप कार्यकत्यांनी PM-CARES Fund मध्ये अधिकाअधिक देणग्या द्याव्यात. तसेच आणखी लोकांना त्यासाठी उद्युक्त करावे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
अवघ्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण; सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, देशभरात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ४९० रुग्ण आढल्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ४०६७ इतका झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होताना दिसत आहे. कोरोनाच्या देशातील एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे ६२ जिल्ह्यांमध्ये आढळून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.