ग्वाल्हेरमध्ये आरएसएसच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भाजपाचे देशभरातले १४०० लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत
ग्वाल्हेर : ग्वाल्हेरमध्ये आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची वार्षिक बैठक होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीबाबत सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यामुळेही या बैठकीला महत्त्व आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भाजपाचे देशभरातले १४०० लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
देशातल्या सध्याच्या राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक मुद्द्यांवर चर्चा आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील असं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार यांनी सांगितलं. मात्र लोकसभा निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा होणार नाही असंही त्यांनी नमूद केलं. संघाच्या शिक्षण धोरणावरही या बैठकीत मंथन होणार आहे.
पाकिस्तानवर भारतीय वायुसेनेनं केलेल्या एअरस्ट्राईक संबंधी प्रश्नावर उत्तर देताना, 'देशातील दहशतवादी घटना, सेनेकडून करण्यात आलेली एअरस्ट्राईक, राम मंदिर आणि लोकसभा निवडणुकीच्या मुद्यांवर बैठकीत सरकार्यवाह भय्याजी जोशी आपले विचार मांडतील' असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. ही बैठक १० मार्चपर्यंत सुरू राहील.