नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून परतले आहेत. यात दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे. पिंपरी चिंचवडचे अण्णा बनसोडे हे आमदार अजित पवारांसोबतच आहेत. त्यामुळे अजित पवारांचे बंड फसल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपकडून अजित पवारांसोबत २७ आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. १० पेक्षा जास्त आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. तर उर्वरित आमदारांना महामंडळ देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही चर्चा आमदार फोडण्यासाठी असल्याची कुजबुजही सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार आणि अण्णा बनसोडे हे दोन आमदार आता राष्ट्रवादीसोबत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. गुडगांवमधील ओबेरॉय हॉटेलात राष्ट्रवादीचे चार आमदार लपून बसले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया धुगन यांनी या आमदारांना घेऊन मुंबईत नेले आहे. मुंबईतील हयात हाटेलमध्ये या आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची बाजू आता अधिक मजबूत झाली आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना दणका देण्यासाठी जोरदार फिल्डींग लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी काय होईल, याकडे लक्ष लागले आहे. तसेच आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. त्यामुळे राजकीय गणिते काय असतील याचीच चर्चा सुरु झाली आहे.



राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना देण्यात आलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले आमंत्रण आणि त्यांचा शपथविधी बेकायदा असून राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने रिट याचिकेद्वारे केली आहे. शनिवारी रात्री उशिरा दाखल केलेल्या याचिकेवर रविवारी न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजय खन्ना यांच्या तीनसदस्यीय पीठापुढे सुनावणी झाली.