राजधानी दिल्लीच्या बदरपूर फ्लायओव्हरवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबादच्या दिशेने येणाऱी कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. कारने आधी दुभाजकाला धडक दिली आणि नंतर एका ट्रकने कारला उडवलं. या अपघातात तीन तरुणांनी आपला जीव गमावला आहे. 


लग्नातून परतत होते तरुण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बदरपूर पोलीस ठाण्यात एक पीसीआर कॉल आला होता. यामध्ये कॉलरने होंडा शोरुमजवळ बदरपूर फ्लायओव्हरवर एका कार आणि ट्रकमध्ये धडक झाली असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं होतं. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, ही कार फरीदाबादच्या दिशेने येत होते. कारमध्ये एकूण 7 लोक होते. एका लग्नसोहळ्यात हजेरी लावून हे सर्वजण दिल्लीला परतत होते. 


दिल्लीला परतत असताना कार बदरपूर फ्लायओव्हरवर पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कारचं नियंत्रण सुटलं आणि दुभाजकावर जाऊन आदळली. कार दुभाजकावर आदळल्यानंतर विरुद्ध दिशेच्या रस्त्याला गेली. यावेळी समोरुन येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. यामुळे आधीच अपघातग्रस्त झालेल्या कारला आणखी एक धडक सहन करावी लागली. 


अपघात इतका भीषण होता की, तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये तीन तरुणांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटली असून 21 वर्षीय राज, 38 वर्षीय संजू आणि 22 वर्षीय दिनेश अशी त्यांची नावं आहेत. तर चारजण जखमी आहेत. त्यांची नावं नीरज, अजित, विशाल, अंसुल अशी आहेत. जखमींना उपचारासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.