Tiger Spotted Taking A Stroll In A Field: जंगलांचा होणारा ऱ्हास आणि वाढत्या शहरीकरणामुळे वाघ, बिबट्यांचं मानवी वस्तीत शिरकाव करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा शिकार शोधण्याच्या प्रयत्नात प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करतात. यामधून वन्य प्राणी आणि मानवामधील संघर्ष वाढल्याचं दिसतं. अशा प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अनेकदा अशा हल्ल्यांचे व्हिडीओ समोर आल्यावर अंगावर काटा येतो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील आहे.


शेजारच्या शेतातून शूट केला व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक वाघ शेताच्या बांधावरुन चालताना दिसत आहे. या वाघापासून काही अंतरावर बाजूच्या शेतात एक शेतकरी ट्रॅक्टरने शेत नांगरताना दिसत आहे. तर अन्य एका शेतामध्ये चक्क शेतकरी काम करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्वीटरवर राज लखानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत वाघ कोथिंबीरीच्या शेतातून निवांतपणे चालत असताना दिसत आहे. या व्हिडीओमधील वाघ आणि नांगरी करणाऱ्या शेतकऱ्यामधील अंतर फारसं नाही. मात्र शेतकऱ्याला बाजूच्या शेतात वाघ असल्याची कल्पनाही नसल्याचं स्पष्ट होत आहे. हा व्हिडीओ अन्य एका शेतकऱ्यानेच आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये शूट केला आहे.


उत्तर प्रदेशमधील व्हिडीओ


व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या कॅप्शननुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील पीलीभीतमधील आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. केवळ 52 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओला 1 लाख 23 हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. 



अनेकांनी नोंदवल्या मजेदार प्रतिक्रिया


हा व्हिडीओ दुखवा राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूचा असेल असं एकाने म्हटलं आहे. या राष्ट्रीय उद्यानामध्ये वाघांची संघ्या मोठ्या प्रमाणात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी पूर्वीच्या जंगलाच्या जमीनीवर आता शेती केली जात असल्याचंही म्हटलं आहे. वाघांच्या भीतीनेच या भागातील शेतांमध्ये मचाण उभारल्या जातात असं या व्हिडीओचा शेवट पाहून एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने हा व्हिडीओ म्हणजे माणूस आणि जंगली प्राणी एकत्र राहू शकतो याचं उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. या व्हिडीओवर अनेक मजेदार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. हा वाघ शेती पहायला आला असेल असं एकाने म्हटलंय. तर अन्य एकाने हा वाघ खास फोटोशूटसाठी आल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी अशा हिरव्या शेतात चालणाऱ्या वाघाची कॅमेरात टिपलेली ही दृश्य फारच सुंदर असल्याचंही म्हटलं आहे.