तिरुपती देवस्थानला लॉकडाऊनचा फटका; नुकसानाचा आकडा वाचून बसेल धक्का
एकंदर परिस्थिती पाहता...
तिरुपती : श्री व्यंकटेश्वर मंदिराचं संचालन आणि पाहणी करणाऱ्या, शिवाय जगातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक असणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान अर्थात TTD कडून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मंदिर प्रशासनाला जवळपास ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
देशभरात Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं. परिणामी देणगी स्वरुपात येणारी मोठी रक्कम आणि त्यातून मंदिर प्रशासनाच्या कोषात पडणारी भर पूर्णत: थांबली आहे.
मंदिर प्रशासनाला नुकसान झालेलं असलं तरीही येत्या काळात मंदिरासाठी काम करणाऱ्या जवळपास २३ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांचं पूर्ण वेतन देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे.
TTDच्या अध्यक्षपदी असणाऱ्या वाय. वी. सुब्बारेड्डी यांच्या माहितीनुसार लॉकडाऊननंतरच्या काळात दर महिन्याला मंदिराला २०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दोन महिन्यांचा कालावधी पाहता हा आकडा ४०० कोटींवर पोहोचला आहे. असं असलं तरीही या कठीण प्रसंगातही मंदिर प्रशसनाकडून कायमस्वरुपी, कंत्राटी आणि पेंशनधारी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात येणार असल्याचं सुब्बारेड्डी यांनी सांगितलं.
भारतात लॉकडाऊनमुळे किती फरक पडला?
मंदिरामध्ये सध्याच्या घडीला देणगीच्या स्वरुपात आर्थिक ओघ येत नसला तरीही प्रशासनाला बऱ्याच मार्गांनी आर्थिक परतावे येणं अपेक्षित आहेत. यामध्ये जवळपास ७०० कोटी रुपयांच्या व्याजाचाही समावेश आहे. देशातील विविध राष्ट्रीय बँकांमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानतर्फे तब्बल १२००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यामुळे येत्या काळात सर्वात श्रीमंत देवस्थानच्या वाटेतील ही आर्थिक अडचण या मार्गांनी दूर केली जाणार आहे. दरवर्षी या मंदिराला तब्बल २.५ कोटीहून अधिक मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.