कोलकाता: निर्मला सीतारामन म्हणजे विषारी नागीण असल्याची विखारी टीका तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली. ते शनिवारी पश्चिम बंगालच्या बंकुरा येथे पेट्रोल दरवाढीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार टीका केली. कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले की,  एखाद्या विषारी नागिणीच्या दंशाने माणसाचा मृत्यू होतो, त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्यामुळे देशातील लोक मरत आहेत. निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. सध्याच्या घडीला निर्मला सीतारामन या जगातील सर्वात वाईट अर्थमंत्री असल्याचेही कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. ममता बॅनर्जी यांची पक्षावरची पकड सुटली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते नैराश्याच्या भरात काहीही बरळत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली. तृणमूल काँग्रेस पक्षात वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार पसरला आहे. पक्षातील अंतर्गत वादांमुळे अनेक नेते भरकटले आहेत. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे नेते निरर्थक बरळत असल्याचेही दिलीप घोष यांनी म्हटले.


यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर आणि कामगारांना थेट न मदत दिल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केले होते. निर्मला सीतारामन यांना ही आव्हानात्मक परिस्थिती सांभाळता येत नाही. त्यामुळे मोदी सरकारने वेळ पडल्यास विरोधी पक्षातील अर्थतज्ज्ञांची मदत घ्यावी, असा सल्ला काँग्रेसकडून देण्यात आला होता.