`मोदींच्या वक्तव्याचा खोडकर पद्धतीने अर्थ काढला`, पंतप्रधान कार्यालयाचं स्पष्टीकरण
चीनसोबतच्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी दिल्ली : चीनसोबतच्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. काही जणांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा खोडकर पद्धतीने अर्थ काढला, असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे. लडाखच्या गलवानच खोऱ्यात चीनसोबत झालेल्या झटापटीमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर पंतप्रधानांनी शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांसोबत संवाद साधला. चीनच्या आक्रमणानंतर भारत शरण गेल्याची टीका राहुल गांधींनी केली होती, त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं.
चीनचं सैन्याने भारताच्या भूभागात प्रवेश केला नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. जर चीनचं सैन्य भारतीय भूभागात घुसलं नाही, मग जवान शहीद कसे झाले? असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येत होता.
'सीमा ओलांडण्याचा प्रयत्न झाला, तर भारत याला चोख प्रत्युत्तर देईल, असं पंतप्रधान म्हणाले होते. याआधी अशाप्रकारच्या आव्हानांकडे दुर्लक्ष केलं जायचं,' असं आजच्या स्पष्टीकरणात सांगण्यात आलं आहे.
'चीनकडून एलएसीवर बांधकाम उभारण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चीन मोठ्या ताकदीनिशी एलएसीवर आलं होतं. चीनकडून या गोष्टी थांबवण्यालाही विरोध झाला, त्यामुळे १५ जूनला झटापट झाली,' अशी माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आली.
चीनच्या सीमवेर शहीद झालेल्या २० जवानांना पंतप्रधानांनी या बैठकीत श्रद्धांजली वाहिली. एलएसीवर चीनकडून बांधकाम उभारण्याचा प्रयत्न आणि घुसखोरीचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न हाणून पाडताना १६ बिहार रेजिमेंटच्या जवानांना हौतात्म्य आलं. भारताच्या भूभागात प्रवेश करणाऱ्यांना भारताच्या सुपूत्रांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं, असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं.