कोरोनावर `ताडी` रामबाण उपाय; नेत्याचा अजब दावा
गंगेच्या पाण्यापेक्षा हे पवित्र
मुंबई : कोरोनाने (CoronaVirus) संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. शास्त्रज्ञ दिवस-रात्र कोरोनावरील लस (Corona Vaccine) शोधण्यात व्यस्त आहे. कोरोनावर नेमका काय उपाय करावा? यावर देश-परदेशात संधोधन केलं जात आहे. असं असताना एका नेत्याने अजब दावा केला आहे. बसपाच्या (BSP) नेत्याने दिलेल्या उपायामुळे (Toddy prevents Covid) सारेच थक्क झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भीम राजभर (Bheem Rajbhar) यांनी कोरोनावार रामबाण उपाय सुचवला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'नदीच्या पाण्यापेक्षाही शु्द्ध ताडी आहे. राजभर समाज ताडीच्या उद्योगातूनच आपल्या मुलांच संगोपन करतो. ताडीचं झाड हे प्राचीनकाळापासून आहे. ताडी प्यायल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. ताडी पिण्यामुळे कोरोना होणार नाही. '
बीएसपीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बलियातील आमदार उमाशंकर सिंह यांनी भीम राजभर यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी नदीच्या पाण्यापेक्षा ताडीत जास्त ताकद असल्याचं म्हटलं आहे. ताडी करोनापासून वाचण्यासाठी कशी मदत करू शकते? याचं मात्र कोणतंही प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय पुरावा राजभर यांना देता आलेला नाही.
यावर, सुहेलदेव भारतीय समज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी जोरदार टीका केलीय. काही लोक बाष्कळ बडबड करून राजभर समाजाच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेनं अशा लोकांपासून सावध राहायला हवं. समाजतल्या अशा लोकांना बसपानं डोक्यावर बसवलंय, असं म्हणत त्यांनी भीम राजभर आणि बसपावर तोंडसुख घेतलं.