नवी दिल्ली: मद्रास आयआयटीच्या कॅम्पसमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या जर्मन विद्यार्थ्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेकब लिंथेंडल असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मद्रास आयआयटीत भौतिकशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (मास्टर्स) शिक्षण घेत होता. त्याने काही दिवसांपूर्वी आयआयटी कॅम्पसमध्ये CAA आणि NRC विरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. यानंतर जेकबला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'दि इंडियन एक्स्प्रेस'ने जेकबला सोमवारी चेन्नई विमानतळावर गाठून याविषयी विचारणा केली. तेव्हा जेकबने म्हटले की, चेन्नईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (एफआरआरओ) आपल्याला यासंबधीचे तोंडी आदेश देण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्रास आयआयटीतील आंदोलनावेळी जेकब लिंथेंडलने एक फलक झळकावला होता. त्यावर '१९३३ ते १९४५ आम्ही याच परिस्थितीत होतो ', असा सूचक संदेश लिहला होता. या माध्यमातून जर्मनीतील नाझी राजवट आणि भारतातील सद्यस्थितीची अप्रत्यक्ष तुलना करण्याचा प्रयत्न जेकबने केला होता. 



जेकब लिंथेंडल स्टुडंच एक्स्चेंज प्रोगामतंर्गत मद्रास आयआयटीत शिक्षण घेत होता. एका क्रीडास्पर्धेत भाग घेण्यासाठी तो गेल्या बंगळुरूत आला होता. त्यावेळी 'एफआरआरओ'कडून आपल्याला ईमेल आल्याचे त्याने म्हटले. 


बंगळुरूतून चेन्नईत परतल्यानंतर जेकबला इमिग्रेशन अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगण्यात आले. यावेळी त्याला त्याचे छंद आणि राजकीय विचारसरणीविषयी विचारणा करण्यात आली. मी CAA विरोधी आंदोलनात का सहभागी झालो होते, याविषयी त्यांनी विचारले. यानंतर आम्ही आंदोलनाच्या संस्कृतीविषयी चर्चा केली. या बैठकीअंती अधिकाऱ्यांनी स्टुडंट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुला भारत सोडावा लागेल, असे सांगितले. मी त्यांना हे लिखीत स्वरुपात द्या, अशी मागणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी मला माझा पासपोर्ट परत दिला. तसेच तुला लिखीत स्वरुपात आदेश मिळतील, असेही सांगितले. मात्र, आपल्याला कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे जेकबने स्पष्ट केले.