`ट्रेन लेट झाल्यास रेल्वे अधिकाऱ्यांची बढती रोखणार` - रेल्वेमंत्री
तुम्ही ट्रेनने प्रवास करता आणि ट्रेनच्या लेटलतीफ कारभाराला कंटाळले आहात? तर मग ही बातमी तुम्हाला काहीसा दिलासा देणारी आहे. कारण...
नवी दिल्ली : तुम्ही ट्रेनने प्रवास करता आणि ट्रेनच्या लेटलतीफ कारभाराला कंटाळले आहात? तर मग ही बातमी तुम्हाला काहीसा दिलासा देणारी आहे. कारण, ट्रेन वेळेवर न येण्याचं प्रकरणं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गांभीर्यानं घेतलं असून आता ट्रेन उशीरा आल्यास आता त्याचा फटका रेल्वे अधिकाऱ्यांना बसणार आहे. पाहूयात सविस्तर वृत्त...
रेल्वेमंत्र्यांनी दिला इशारा
ट्रेन उशीरा आल्यास त्याचा परिणाम रेल्वे अधिकाऱ्यांच्या वैयक्तीक कामगिरी (परफॉर्मन्स रिपोर्ट) वर होणार असल्याचा इशारा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या झोनल प्रमुखांना दिला आहे. ट्रेन उशीरा आल्यास संबंधित अधिकाऱ्यांची बढती (प्रमोशन) रोखण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलाय.
एका महिन्याचा कालावधी अन्यथा...
गेल्या आठवड्यात एका विभागीय बैठकीत रेल्वेमंत्र्यांनी या मुद्द्यावरुन रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. ट्रेन उशीरा धावण्याची कारणं सांगत बसू नका असं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं. रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली की, "रेल्वे अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्यासाठी एका महिन्याचा काळ दिला जाईल. ३० जूनपर्यंत जर सुधारणा झाली नाही तर महाव्यवस्थापकांना बढती मिळणार नाही" असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
कुठलीच सुधारणा नाही
आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान भारतीय रेल्वेच्या ३० टक्के ट्रेन उशीरा धावल्या. सध्या सुरु असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि या आकड्यांत कुठलीच सुधारणा होताना दिसत नाहीये. सूत्रांच्या मते, उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना रेल्वेमंत्र्यांनी फटकारलं. या झोनमध्ये २९ मेपर्यंत ट्रेन्स उशीरा धावत होत्या. आकडेवारीचा विचार केला तर हा आकडा खूपच खराब म्हणजेच ४९.५९ टक्के आहे जो गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२.७४ टक्क्यांनी अधिक आहे.
ट्रेनच्या या लेटलतीफ कारभारावर आता रेल्वेमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं असल्याने आतातरी काही सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.