गोवा : मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात (MONSOON) पावसानं चांगलाच जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि नजीकच्या राज्यांमध्येही पाऊस चांगलाच बसरत आहे. वरुणराजाची ही कृपा झाल्यामुळे अनेक ठिकाणी कडेकपारी आणि डोंगररांगांमधून धबधबे (Waterfall) वाहण्यास सुरुवात झाली आहे. लोणावळा, महाबळेश्वर, इगतपुरी या भागांमध्ये डोंगरागांमध्ये अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. असाच आणखी एक धबधबा सध्या पर्यटकांचं लक्ष वेधत आहे, तो म्हणजे दूधसागर धबधबा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा धबधबा इतक्या तीव्रतेनं प्रवाहित झाला की, अक्षरश: त्याजवळून जाणारी रेल्वेही काही क्षणांसाठी थांबवण्यात आली. सोशल मीडियावर त्यासंबंधीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेल्वे धबधब्याजवळून जात असतानाच पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळं गती कमी करत रेल्वे थांबवण्यात आली. 


Mumbai Local : लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 


 


पावसानं चांगलाच जोर पकडल्यानंतर (Doodhsagar Waterfall) दूधसागर धबधबा प्रवाहित होऊन त्याचं सौंदर्य तेथून जाणाऱ्या रेल्वेतूनही पाहता येतं. गोव्याला बंगळुरूशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर हे विहंगम दृश्य पाहायला मिळतं. या धबधब्याचं फेसाळतं पाणी आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे असंख्य तुषार यामुळं या परिसरातील सौंदर्य मनावर वेगळीच फुंकर घालून जातं. या धबधब्याच्या आजुबाजूच्या परिसरातही घनदाट वनराई पसरली असून तिथं मोठ्या प्रमाणात जैवविविधताही पाहता येते. 




पश्चिम घाटातून वाहणाऱ्या मांडवी नदीच्या पात्रावर हा धबधबा वाहतो. पश्चिम घाटात असणाऱ्या मोल्लेम राष्ट्रीय उद्यान आणि भगवान महावीर अभयारण्य परिसरात या धबधब्याचं सौंदर्य पाहता येतं. दूधसागर हा देशातील सर्वाधिक उंच धबधब्यांपैकी एक आहे. या धबधब्याची उंची 310 मीटर इतकी असून, त्याची सरासरी रुंदी 30 मीटर इतकी आहे. 


दरम्यान, येत्या काळात महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, गोवा (Goa) या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं दूधसागर धबधब्याच्या परिसरात येते काही दिवस अशाच पद्धतीचं चित्र दिसणार यात शंका नाही.