नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर देशभरातील वातावरण बदललं. पाहता पाहता अनेक व्यवहार ठप्प झाले. यातच पोटाची खळगी भरण्यासाठी खेड्यांकडून शहराची वाट धरलेल्या मजुरांची मोठ्या प्रमाणात वाताहात झाल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाताला काम नाही, खिशात पैसा नाही आणि पोट भरण्यासाठी अन्न नाही अशा अवस्थेत काही मजुरांनी पायी प्रवास करत आपली मुळ गावं गाठण्याचा प्रयत्न केला. अखेर, बऱ्याच घडामोडी आणि उलथापालथीनंतर स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांत पोहोचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. देशाच्या विविध भागांतून मजुरांना या रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या मुळ राज्यांत पाठवण्यात आलं. 


शासनाकडून ही तरतूद करण्यात आली खरी. पण, त्यात बरेच अडथळे आले. मजुरांच्या तिकिटांपासून ते अगदी रेल्वे वाट चुकण्यापर्यंतच्या चर्चाही कानांवर आल्या. हा सर्व सावळा गोंधळ पाहता देशाचे माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कारभाराविषयी एक उपरोधिक ट्विट केलं आहे. 


'पाटणा हे गंतव्याचं स्थान असतानाही रेल्वे ही पश्चिम बंगालमध्ये पोहोचते. आता डिजिटल भारतात हे असं घडलं तरी कसं याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावं', अशा आशयाचं ट्विट तेजस्वी यादव यांनी केलं. ज्यानंतर त्यांचे वडील आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री व्यक्त झाले. तेजस्वी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत, 'रेल्वे गाड्या जरा जास्तच आत्मनिर्भर झाल्या आहेत....' असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला.



 


काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला कोरोना व्हायरसच्या वातावरणादरम्यान संबोधित करताना आत्मनिर्भर भारताविषयी वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर सर्व स्तरांतून 'आत्मनिर्भर' हा शब्द उलचून धरण्यात आला. त्यातच आता लालू प्रसाद यांचा हा टोला पाहता त्यावर सोशल मीडियावर सक्रिय असणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.