मथूरा : उत्तर प्रदेशातील मथूरा लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालीनी या मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्या. हेमा मालीनी आपल्या ताफ्यासह रस्त्यावरून निघाल्या होत्या. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे रस्ता आणि परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले. वाऱ्याचा वेग इतका होता की, रस्त्याकडेचे वृक्षही उन्मळून पडले. त्यातलाच एक वृक्ष हेमा मालीनी यांच्या ताफ्यातील गाडीसमोरच पडला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हेमा मालीनी मतदारसंघातील एका गावातील सभा संपवून परतत होत्या. 


सभा सुरू असतानाच वातावरणात बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हेमा मालीनी या मथूरा मतदारसंघातील मांट तालूक्यातील एका गवात सभेसाठी आल्या होत्या. भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झालेबद्दल 'सबका साथ सबका विकास' या धोरणाची माहिती देण्यासाठी त्या येथे आल्या होत्या. दरम्यान, त्यांची सभा सुरू असतानाच वातावरणात बदल होत होता. बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन हेमा मालीनी यांनी कार्यक्रम आटोपून परतण्याचा निर्णय घेतला.


ताफ्यातील गाडीसमोर उन्मळून पडला वृक्ष


दरम्यान, सभा आटोपून त्या परतत असताना त्यांच्या ताफ्याने गावापासून काही किलोमिटर अंतर पार केले. मात्र, अचानक वादळी वाऱ्यास सुरूवात झाली. या वाऱ्यातच एक वृक्ष ताफ्यातील गाडीसमोर उन्मळून पडला. पोलीस कर्मचाऱ्यांनी काही वेळातच हे झाड बाजूला केले. मात्र, तोपर्यंत हेमा मालीनी यांना अर्धा तास वाट पहावी लागली.