बटर चिकन आणि दाल मखनीचा शोध कोणी लावला? वाद हायकोर्टात पोहोचला
Trending News : बटर चिकन आणि दाल मखनी हे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेले पदार्थ आहेत. पण या डिशचा शोध कोणी यावरुन आता एक नवा वाद सुरु झालाय आणि तो थेट हायकोर्टात पोहोचलाय.
Trending News : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे, त्याचप्रमाणे राज्यांप्रमाणे तिथल्या खाण्याची चवही बदलत जाते. त्या त्या राज्यात उपलब्ध असलेले मसाले, भाज्या आणि फळ्यांचा वापरानुसार तिथले पदार्थ बदलतात. पण काही पदार्थ असे असतात जे प्रत्येक संपूर्ण देशभरात आवडीने खाले जातात. यापैकीच दोन पदार्थ म्हणजे बटर चिकन आणि दाल मखनी. हे दोन पदार्थ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पण सध्या या पदार्थांचा शोध कोणी लावला यावरुन वाद सुरु झाला आहे. दिल्लीतल्या दोन प्रतिष्ठित रेस्टोरेंटने या दोन पदार्थांचा शोध लावल्याचा दावा केला आहे. प्रकरण इतकं टोकाला गेलंय की हा वाद आता दिल्ली हायकोर्टात पोहोचलाय.
दोन रेस्टोरेंटमध्ये वाद
दिल्लीतील मोती महल (Moti Mahal) आणि दरियागंज (Daryaganj) या दोन रेस्टोरेंटने बटर चिकन (Butter Chicken) आणि दाल मखनीचा (Dal Makhani) शोध लावल्याचा दावा केला आहे. 1947 मध्ये कुंदनलाल गुजराल यांनी बटर चिकन आणि दाल मखनीचा अविष्कार केला असा दावा मोती महल रेस्टोरेंटने केला आहे. तर या पदार्थांचा इतिहास 19व्या शतकाशी जोडला गेलाय असं दरियागंज रेस्टोरेंटचं म्हणणं आहे.
शोध लावल्याचा दावा
मोती महल रेस्टोरेंटच्या म्हणण्यानुसार कुंदन लाल गुजराल हे चिकन टिक्क मसाला बनवत असताना त्यांनी चुकून त्यात टमाटर आणि बटर मिक्स केलं. त्याची चव खूपच छान होती, म्हणून त्यांनी या डिशला बटर चिकन असं नाव दिलं. बटर चिकनप्रमाणेच गुजराय यांनी दाल मखनीच्या रेसिपीतही बदल केला होता.
तर दरियागंज रेस्टोरेंटने केलेल्या दाव्यानुसार बटर चिकन आणि दाल मखमी हे दोन्ही पदार्थ पेशावरमधून भारतात आलेत. याचा इतिहास 19 व्या दशकातील आहे. हे पदार्थ पेशावरमधून भारतात आले आणि ते लोकप्रिय झाले.
हायकोर्टात वाद
दरियागंज रेस्टोरेंटने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना मोती महलच्या मालकाने अपमानकराक वक्तव्यकेलं होतं. याचा दरियागंज रेस्टोरेंटने विरोध केला. मोती महलच्या मालकाने केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा दरियागंज रेस्टोरंटने कोर्टात केला आहे. दुसरीकडे मोती महल रेस्टोरेंटने देखील दरियागंज रेस्टोरेंटविरोधात याचिका दाखल केली आहे. बटर चिकन आणि दाल मखनीची शोध लावल्याचा दरियागंजचा दावा चुकीचा असून कोर्टाने त्यांच्यावर असं करण्यापासून रोख लावावी अशी मागणी मोती महल रेस्टोरेंटने केली आहे.
दिल्ली हायकोर्टात या प्रकरणाची येत्या 29 मार्चला सुनावणी होणार आहे. खाण्याचे शौकिन असलेल्यांसाठी हा वाद चांगलाच मनोरंजनाचा ठरत आहे.