अगारतळा : प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायायलायनं दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही फटाकेविक्रीवर बंदी आणण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी न्यायायलायच्या या निर्णयावर टीका केली आहे. मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी करणारे आता प्रदुषणाचं कारण देऊन चिता जाळण्याविरोधातही याचिका दाखल करतील, असा टोला तथागत रॉय यांनी लगावला आहे. भाजपचे नेते असलेल्या तथागत रॉय यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया दिली आहे.


दिल्ली आणि एनसीआर भागामध्ये १ नोव्हेंबर २०१७ पर्यंत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर १ नोव्हेंबर २०१७नंतर काही अटी आणि नियम लावून फटाके विक्री करण्यात येणार आहे.