बटाट्याने उधळला SBI सहीत 2 बँकांवरील दरोड्याचा कट! ज्वेलर्सचं दुकानही फोडणार होते पण...
Potato Exposed Robbery Plan: पहाटे 4 वाजता घडलेल्या या घटनेमुळे एक मोठा कट समोर आला. वेळीच याची माहिती मिळाल्याने 2 बँकांबरोबरच ज्वेलर्समध्ये डाका टाकण्याचा कट उघड झाल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
Potato Exposed Robbery Plan: कोणत्याही भाजीत दिसणारी गोष्ट म्हणजे बटाटा! याच बटाट्याने चक्क पोलिसांची भूमिका पार पाडली आहे असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र खरंच असं घडलं आहे आणि ते ही भारतात. बटाटे भरलेल्या एका ट्रकने कोट्यवधी रुपयांची चोरी होण्याआधीच चोरांचा डाव उघडा पाडला. तुमचा विश्वास बसणार नाही पण बटाट्याने 2 बँका आणि एका ज्वेलर्सच्या दुकानावर डाका टाकण्याचा डाव हाणून पाडला. नेमकं घडलं काय पाहूयात...
त्या पहाटे नेमकं घडलं काय?
राजस्थानमधील जयपूरमध्ये असलेल्या अंबाबाडी भाजी मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे भाज्यांचे ट्रक येत-जात होते. मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास बटाट्यांच्या गोणी घेऊन अनेक ट्रक या भाजी मार्केटमध्ये दाखल झाले. मात्र बटाट्यांनी भरलेला एक ट्रक मार्केटमध्ये प्रवेश करत असतानाच गेटजवळची जमीन खचली आणि त्यात हा ट्रक अडकला. व्यापाऱ्यांनी ट्रक मागे पुढे करुन खड्ड्यातून काढला तर इतर ट्रक आत येऊ शकतील असा विचार करुन प्रयत्न सुरु केला. मात्र हा ट्रक खड्ड्यातून काढताना तो कोणत्याही नाल्यात, गटारात किंवा खड्ड्यात अडकला नसून एका भुयारामध्ये अडकल्याचं व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं. हा ट्रक जिथे खचला तिथे खाली मोठं भुयार असल्याचं लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली. विद्याधर नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सत्य समोर आलं. या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आलं.
तपासात धक्कादायक खुलासा
पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अंबाबाडी भाजी मार्केट खालून जाणारं हे भुयार सोहनलाल धोबीच्या दुकानापर्यंत जात असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या दुकानाचा टाळा तोडून आत प्रवेश केला तर या दुकानामालकाबरोबर पोलिसांनाही धक्का बसला. दुकानमालक आणि त्याचा मुलगा राजेश यांनी 11 हजार रुपये प्रति महिना भाड्यावर मागील 6 महिन्यांपासून हे दुकान भाडेतत्वावर देण्यात आल्याचं पोलिसांना सांगितलं. उत्तर प्रदेशमधील अन्वर, सलमानसहीत 4 लोकांना हे दुकान भाड्याने दिल्याचं पोलिसांना कळवण्यात आलं. आपण भाजी मार्केटमध्ये काम करतो असं सांगून या तरुणांनी मनोज नावाच्या व्यक्तीची ओळखपत्रंही घरमालकाला दिली होती. पोलिसांनी घरमालकाला या तरुणांना दुकानावर बोलवून घेण्यास सांगितलं. मात्र केवळ एक तरुण तिथे आला. त्यातही त्याने पोलिसांना पाहिल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना पाठलाग करुन त्याला पकडलं.
दुकानात काय सापडलं?
दुकानाची तपासणी केली तर बरीच खोटी कागदपत्रं, भाड्याचा करारनामा आणि भुयाराचा नकाशा पोलिसांना सापडला. पोलिसांनी या तरुणाची कसून चौकशी केली असता त्याने दुकानाच्या खाली 10 फूटांवर खोदलेलं 100 मीटर लांब भुयार एसबीआय बँक, सेंट्रल बँक आणि एका ज्वेलरी शोरुमच्या दिशेने जात असल्याचं स्पष्ट झालं. मात्र हे भुयार पूर्णपणे खोदण्यात आलेलं नव्हतं. या बँका आणि ज्वेलर्सच्या दुकानापासून 50 फुटांचं खोदकाम बाकी होतं. मात्र त्यापूर्वीच बटाट्याचा ट्रक खचल्याने या कटाचा भांडाफोड झाला.
पोलिसांनी काय सांगितलं आहे?
जयपूर उत्तरचे डीसीपी राशी डोगरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळीच या भुयाराचा शोध लागला नाहीतर या चोरांनी मोठा हात मारला असता, असं म्हटलं. या भुयारामध्ये एलईडी बल्बही लावण्यात आले होते. खोदकामाची बरीच अवजारेही येथे सापडली. ही गँग उत्तर प्रदेशमधील बरेलीमधील आहे. मागील 4 ते 5 महिन्यांपासून भुयार खोदण्याचं काम हे लोक करत होते. या दुकानातील नकाशावरुन एसबीआय बँकेत डाका टाकण्याचा या तरुणांचा कट असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.