मुंबई : भारतातली सगळ्यात मोठी दूध डेयरी अमूलचं ट्विटर अकाऊंट डिएक्टिव्हेट झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर याविरोधात आवाज उठवण्यात आल्यानंतर अखेर अमूलचं ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आलं. अकाऊंट डिएक्टिव्हेट करण्यात आल्यामुळे अमूलने अधिकृतरित्या तक्रार केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमूलने चीनचा संदर्भ देत एक्झिट द ड्रॅगन या नावाने एक कार्टुन पोस्ट केलं होतं. या कार्टुनमध्ये नेहमीप्रमाणे 'अमूल गर्ल' दाखवण्यात आली. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संदेश या कार्टुनमधून देण्यात आला होता. या कार्टुनमध्ये अमूल गर्ल ड्रॅगनशी लढत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसंच या कार्टुनमध्ये चीनचं व्हिडिओ शेयरिंग मोबाईल ऍप टिकटॉकही दाखवण्यात आलं आहे. अमूल हा 'मेड इन इंडिया' ब्रॅण्ड असल्याचंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. 


अमूलच्या या ट्विटनंतर काही वेळामध्येच ट्विटरवर अमूलचं अकाऊंट डिएक्टिव्हेट करण्यात आलं. ट्विटरवर अमूलचं अकाऊंट उघडल्यानंतर हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं आहे, कारण अकाऊंटवरून काही असामान्य गोष्टी घडल्या आहेत, असा संदेश येत होता. 


ट्विटरने अमूलचं अकाऊंट डिएक्टिव्हेट केल्याबद्दल अमूलने आक्षेप घेत तक्रारही केली आहे. 'अशाप्रकारे अकाऊंट ब्लॉक करण्याआधी आम्हाला माहिती का देण्यात आली नाही?' असा सवाल अमूलचे एमडी आर.एस.सोदी यांनी विचारला. अमूलचं ट्विटर अकाऊंट नेमकं का डिएक्टिव्हेट करण्यात आलं? याबाबत ट्विटरकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 


अमूलचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावरही याच्या प्रतिक्रिया उमटल्या. ट्विटरवर मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी अमूलचं समर्थन केलं. एवढच नाही, तर अमूलचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेन्डिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता.