मध्य प्रदेशात भाजपला दे धक्का, दोन आमदार काँग्रेसच्या जाळ्यात
काँग्रेसने आपल्या जाळ्यात भाजपचे दोन आमदार ओढले आहेत.
भोपाळ : कर्नाटकनंतर भाजप मध्य प्रदेशात मोर्चा वळवणार अशी जोरदार चर्चा होती. भाजपच्या काही नेत्यांनी याबाबत वक्तव्यही केले होते. मात्र, मुख्यमंत्री कमलनाथ यांनीच भाजपला दे धक्का दिला आहे. काँग्रेसने आपल्या जाळ्यात भाजपचे दोन आमदार ओढले आहेत. त्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेत क्रिमिनल लॉ दुरुस्ती विधेयक मांडले. या विधेयकाच्या बाजुने भाजपच्या दोन आमदारांनी मतदान केले. दरम्यान, हे दोन्ही आमदार अज्ञातस्थळी आहेत.
मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे. विधानसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकावर भाजपाच्या दोन आमदारांनी कमलनाथ सरकारच्या समर्थनार्थ मतदान केले. हा भाजपसाठी मोठा हादरा आहे. भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कौल यांनी काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केले. हे दोन्ही आमदार काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. तर दुसरीकडे कमलनाथ सरकारधील मंत्री जयवर्धन सिंह यांनी भाजपचे हे दोन्ही आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भाजपला जोरदार दणका काँग्रेसने दिल्याची चर्चा आहे.
कमलनाथ सरकारने विधानसभेत क्रिमिनल लॉ दुरुस्ती विधेयक मांडले. या विधेयकावर मतदान घेण्यात आले. यावेळी भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कौल यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले आहे. त्यानंतर भाजपाचे आमदार त्रिपाठी आणि कौल यांनी सांगितले, आम्ही आमच्या मतदारसंघाच्या विकास करण्यासाठी कमलनाथ सरकारला पाठिंबा दिला आहे.
२३० सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसचे १२१ आमदार आहेत. तर अध्यक्ष या नात्याने एनपी प्रजापती यांनी आज झालेल्या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला नाही, त्यामुळे काँग्रेसच्या १२० व भाजपाच्या दोन अशा एकूण १२२ आमदारांनी या विधेयकावर काँग्रेसच्या बाजूने मतदान केले.
दरम्यान, त्याआधी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले होते, तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही बहुमत चाचणी घेऊ शकता. तर विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव यांनी दावा केला होता, वरिष्ठ पातळीवरून नंबर एक आणि नंबर दोनकडून आदेश आला तर सरकार एक दिवस देखील टिकणार नाही. त्यामुळे काँग्रेसने भाजपचे दोन आमदार गळाला लावून भाजपला शह दिला आहे. दरम्यान, कालच कर्नाटकातील काँग्रेस- जेडीयूचे सरकार पाडण्यात भाजपला यश आले होते. त्यामुळे भाजपचे पुढचे टार्गेट मध्य प्रदेश होते, असे बोलले जात होते.