Russia-Ukraine Crisis : 219 भारतीय नागरिकांना घेऊन युक्रेनमधून पहिले विमान भारतात पोहोचले. एअर इंडियाचे हे विमान मुंबई विमानतळावर उतरले. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून शनिवारी दुपारी विमानाने उड्डाण केले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर (रशिया-युक्रेन युद्ध) भारत सातत्याने तेथील नागरिकांची चिंता व्यक्त करत आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय, विशेषतः विद्यार्थी राहतात. हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली होती. (First evacuation flight landed Mumbai) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परतलेल्या नागरिकांचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) स्वतः विमानतळावर पोहोचले होते. ते म्हणाले, 'या संकटाच्या सुरुवातीपासून युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला परत आणणे हा आमचा मुख्य उद्देश होता. 219 विद्यार्थी येथे पोहोचले आहेत. ही पहिली बॅच होती. दुसरी लवकरच दिल्लीला पोहोचेल. सर्वांना घरी आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.' हे मिशन यशस्वी केल्याबद्दल त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.



यादरम्यान एअर इंडियाच्या फ्लाइट अटेंडंटने सांगितले की, 'आमच्या विद्यार्थ्यांना घरी परत आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मुंबईत आल्यावर विद्यार्थ्यांनी आनंदाने उड्या मारल्या. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार.'


युक्रेनमधून परतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने सांगितले की, 'मला भारत सरकारवर विश्वास होता की ते नक्कीच आम्हाला आमच्या देशात परत आणतील. थोडी भीती आणि घबराट होती, पण भारतात परत आल्याने आम्हाला खूप आनंद झाला.



एअर इंडियाचे विमान AI 1944 219 प्रवाशांसह शनिवारी संध्याकाळी 7.50 वाजता मुंबईत पोहोचले. दुपारी बुखारेस्ट येथून उड्डाण केले. भारतात सुखरूप उतरल्यावर सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद आणि दिलासा होता. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेला ऑपरेशन गंगा असे नाव देण्यात आले आहे.


आणखी एक दुसरे विमान दिल्लीत लँड झाले आहे.



रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी शांतता पुनर्स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची भारताची वचनबद्धता व्यक्त केली. तेथे सुरू असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांना भारतीय नागरिकांच्या जलद आणि सुरक्षित बाहेर काढण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले.


हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षित परतीचा मुद्दा उपस्थित केला. भारताने आपल्या नागरिकांचे सुरक्षितता हे आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते की, ते मिशनवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत. सरकार प्रत्येक स्तरावर काम करत आहे. यामध्ये त्यांच्या बाजूने कोणतीही कसर सोडली जाणार नाही.