मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) अखेर भारतात शिरकाव केला आहे. कर्नाटकमध्ये दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आले आहे. यापैकी एक रुग्ण नुकताच दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतला आहे, तर दुसरी व्यक्ती आरोग्य कर्मचारी आहे. बेंगळुरू महानगरपालिकेने दोन्ही संक्रमित रुग्णांची संपूर्ण माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक रुग्ण दुबईमार्गे भारतात
Omicron प्रकाराची लागण झालेली 66 वर्षांची व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात परतली असून 20 नोव्हेंबर रोजी विमानतळावरून त्याचे नमुने घेण्यात आले. त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.


बेंगळुरू महानगरपालिकेच्या अहवालानुसार, या व्यक्तीने निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन दक्षिण आफ्रिकेतून भारतात प्रवास केला. भारतात परतल्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला.


यानंतर 22 नोव्हेंबरला त्याचा कोविड नमुना पुन्हा घेण्यात आला आणि तो जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला. मात्र, यादरम्यान या व्यक्तीची खासगी लॅबमध्ये पुन्हा कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.


दुसऱ्या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही
ओमिक्रॉन पॉझिटिव्ह दुसऱ्या 46 वर्षीय रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. बंगळुरू महानगरपालिकेच्या अहवालानुसार, त्या व्यक्तीला 21 नोव्हेंबरला ताप आला तसंच अगं दुखू लागलं होतं. त्यानंतर त्याने रुग्णालयात जाऊन त्याची आरटीपीसीआर चाचणी केली. चाचणीचा अहवाल आल्यानंतर 22 नोव्हेंबरला तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा नमुनाही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आहे.


हा रुग्ण 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत होम आयसोलेशनमध्ये होता. त्यानंतर 25 नोव्हेंबरला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवसांच्या उपचारानंतर 27 नोव्हेंबरला त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.


संपर्कात आलेले 5 जण पॉझिटिव्ह
अहवालानुसार, 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत त्याच्या संपर्कात आलेले एकूण 5 लोक देखील पॉझिटिव्ह आढळले होते, ज्यांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 218 लोकांवरही नजर ठेवली जात आहे.


29 देशात ओमायक्रॉनचे रुग्ण
आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेली रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला होता.


ओमायक्रॉनबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात
ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा जास्त घातक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणं आहे. ओमायक्रॉन संक्रमित व्यक्ति 18 ते 20 लोकांना पॉझिटिव्ह बनवू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


भारतात कोरोनाची स्थिती
दुसरीकडे, देशातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. गेल्या महिनाभरापासून देशात दैनंदिन रुग्णांमध्ये घट होत आहे. आता फक्त महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये 10 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणं आहेत. जी देशातील एकूण संक्रमित प्रकरणांपैकी 55 टक्के आहेत.


49 टक्के लोकांना दोन डोस
लव अग्रवाल दिलेल्या माहितीनुसार देशातील सुमारे 49 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रकरणात घट झाली आहे.