उत्तर प्रदेशातील बरेलीत एक धक्कादायक घटना घडली असून एकच खळबळ माजली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकून दिलं. ट्रेनखाली आल्याने तिचा एक हात आणि दोन पाय कापले गेले आहेत. तरुणीची प्रकृती सध्या गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भास्कर रुग्णालयात मुलगी जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीची अनेक हाडंही मोडली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्यात असमर्थ ठरल्याने पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, शिपाई आणि आणखी एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, उप जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस पोलीस महानिरीक्षक, जिल्हा दंडाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन मुलींची भेट घेतली आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कारवाईचं आश्वासन दिलं आहे. 


सीबीगंज पोलीस ठाणे क्षेत्रात राहणारी विद्यार्थिनी कोचिंग क्लासला गेली होती. मुलीच्या काकांनी सांगितलं की, ती क्लासला जाताना येताना एक तरुण आणि त्याचा साथीदार तिची छेड काढत असे. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडे तक्रार करण्यात आली होती. पण यानंतर ते दोघे ऐकत नव्हते. मंगळवारी विद्यार्थिनी कोचिंग क्लासवरुन परतत होती. यानंतर ती रेल्वे क्रॉसिंगवर रक्तबंबाळ अवस्थेत सापडली होती. तिचे दोन्ही पाय कापले गेले होते. 


चौकशीदरम्यान माहिती मिळाली की, आरोपींनी रस्त्यात तिची छेड काढली होती. विरोध केला असता त्यांनी तिला ट्रेनसमोर फेकून देत ठार करण्याचा प्रयत्न केला. सध्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


मुलीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, आरोपी तिच्यावर दबाव टाकत होता. एकतर्फी प्रेमातून तो तिचा पाठलाग करत होता. त्याने याआधीही असं केलं आहे. जीव वाचवताना मुलगी येथे आली असावी. आरोपींनी धक्का देऊन तिला ट्रेनसमोर ढकललं. 


मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसंच पीडित मुलीला 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच याप्रकरणी बेजबाबदारपणा केल्याबद्दल तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


गुन्हा दाखल


कुटुंबाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या वडिलांना बेड्या ठोकल्याआहेत. त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे.