आता मजबूत सरकार, राम मंदिर उभारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही- उद्धव ठाकरे
अयोध्येत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय.
लखनऊ: लोकसभा निवडणुकीनंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मजबुत सरकार आले आहे. त्यामुळे आता सरकारने राम मंदिर उभारायचे ठरवल्यास आपल्याला कोणी रोखू शकत नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रविवारी अयोध्येतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव यांनी रविवारी शिवसेनेच्या १८ खासदारांसह अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल, असा विश्वासही व्यक्त केला. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा व कायदा बनवून भव्य राम मंदिराची उभारणी करावी, या मागणीचा पुनरूच्चार उद्धव यांनी केला.
राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असला तरी लोकसभेत नवा कायदा तयार होऊ शकतो. आता आपले सरकारही मजबुत आहे. आपल्याला थांबवायला कोणी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राम मंदिर उभारण्याची हिंमत आहे. त्यामुळे सरकारने ठरवले तर राम मंदिर उभे राहील. देशातील सर्व हिंदूंचा त्याला पाठिंबा असेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
उद्यापासून संसदेचे कामकाज सुरू होत असून रामलल्लाचे दर्शन घेऊनच शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार आपली नवी इनिंग सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच युती पुढे जाण्यासाठी राम मंदिराची निर्मिती होणे गरजेचे आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे, या प्रमुख मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत युती केलेली आहे. हिंदू हितासाठीच शिवसेना महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवत नसल्याचेही उद्धव यांनी सांगितले.
आठवले म्हणतात, उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येत गेले तरी...