नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या विजयी 18 खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे जाऊन राम जन्मभुमीला भेट देणार आहेत. निवडणुकीआधी आधी मंदिर मग सरकार असा आवाज शिवसेनेने दिला होता. या पार्श्वभुमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आता केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्याला गेले तरी राममंदीराचा विषय सर्वोच्च न्यायालय निर्णय येत नाही तोवर निकाली लागणार नाही असे स्पष्ट मतं आठवलेंनी व्यक्त केलंय.
उद्धव ठाकरे यापूर्वी अयोध्याला गेले होते पुन्हा पुन्हा आयोध्याला जाण्याची गरज नाही असे विधानही आठवलेंनी केले आहे. राममंदीर हे कायदेशीर मार्गाने बांधले जावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराविषयी देखील भाष्य केले. राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे त्यावेळी एक मंत्रीपद आरपीआय पक्षाला मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अयोध्येत राम मूर्ती लावणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यामुळे राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अयोध्या शोध संस्थानातर्फे या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. काष्ठ कला दुर्मिळ मूर्तीची स्थापना अयोध्येच्या शोध संस्थान शिल्प संग्रहालयात करण्यात येणार आहे. ही मूर्ती पुढच्या काळात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरणार आहे. ही मूर्ती कावेरी कर्नाटक स्टेट आर्ट एंड क्राफ्ट एंपोरियम येथून खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 35 लाख इतकी किंमत मोजण्यात आली आहे. या मूर्तीला 2017 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.