लखनऊ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. त्यासाठी तेथील परिस्थितीचा शिवसेनेकडून आढावा घेण्यात येत आहे. शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांनी अयोध्येचा दौरा केला होता. आज पुन्हा दुसऱ्यांना त्यांनी दौरा केलाय. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राऊत यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली. औचित्य उद्धव ठाकरे यांची अयोध्यावारीचे होते. लखनऊ येथील मुख्यमंत्री कार्यालयात दोन नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचा 25 नोव्हेंबरला होत असलेला अयोध्या दौरा सुरळीत पार पडावा आणि त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळावे याविषयांवर चर्चा झाली.


या चर्चेच्यावेळी उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणालेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. राम मंदिर निर्माणाचा प्रश्न लवकरात लवकर चर्चेने सुटावा, असा बैठकीत चर्चेचा सूर होता. दरम्यान, मुंबईतील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. राम मंदिर उभारण्यासाठी वेळ जात आहे. दिलेले आश्वासन भाजप विसरले आहे. तुम्ही मंदिर बांधता की आम्ही बांधू, अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत घेतली.