Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीआधी `धनुष्य बाणा`चा फैसला?
महाराष्ट्राच्या नजरा आता केंद्रीय निवडणूक (Election Comission) आयोगाकडे लागल्यात.
मुंबई : धनुष्यबाण चिन्हासाठी शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटात (Shinde Group) शनिवारी निवडणूक आयोगापुढं (Election Comission) सुनावणी होणाराय. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) एकनाथ शिंदे गटानंही धनुष्य बाण चिन्हावर दावा ठोकलाय. त्यामुळं पोटनिवडणुकीआधी धनुष्य बाण चिन्हाचा फैसला होईल का? पाहूयात हा रिपोर्ट. (uddhav thackeray vs eknath shdine group fight over to bow arrow andheri by election 2022)
महाराष्ट्राच्या नजरा आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लागल्यात. कारण धनुष्य बाण चिन्ह उद्धव ठाकरे गटाला द्यायचं की, एकनाथ शिंदे गटाला याचा फैसला निवडणूक आयोग करणाराय.. येत्या ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झालीय. त्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणाराय..
अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्य बाण चिन्ह मिळावं, अशी मागणी शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे केलीय. निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या या मागणीचं पत्र ठाकरे गटाला ईमेलवरून पाठवलंय. यासंदर्भात 8 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडा, असे आदेश निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला दिलेत. या मुदतीत उत्तर दिलं नाही तर निवडणूक आयोग योग्य ती कार्यवाही करेल, असा इशाराही आयोगानं दिलाय.
दरम्यान, खरी शिवसेना कुणाची, हा वादही निवडणूक आयोगापुढं प्रलंबित आहे.. त्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटानं विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रं शुक्रवारी निवडणूक आयोगाला सादर केली. शिंदे गटाच्या वतीनं उत्सव त्रिवेदी, तर ठाकरे गटाच्या वतीनं देवदत्त कामत यांना कागदपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे आयोगाच्या स्वाधीन केले.
'धनुष्य बाणा'साठी सामना
एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, असा दावा यावेळी शिंदे गटाकडून करण्यात आलाय. शिंदेंच्या अध्यक्षपदाला 40 आमदार, 12 खासदार, 7 लाख प्राथमिक सदस्य, 144 पदाधिकारी आणि 11 राज्य प्रभारी यांचा पाठिंबा असल्याचंही शिंदे गटानं स्पष्ट केलंय. तर उद्धव ठाकरे गटाकडून 180 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आलीत.
23 जानेवारी 2023 पर्यंत उद्धव ठाकरे हेच पक्षाध्यक्ष असल्याचं ठाकरे गटानं स्पष्ट केलंय. मात्र अडीच लाख प्रतिनिधींची प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी आणखी चार आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी ठाकरे गटानं आयोगाला केलीय. धनुष्य बाणासाठी ठाकरे आणि शिंदे गटात सुरू झालेली लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलीय. धनुष्य बाण चिन्ह कुणाला मिळणार, यावर केवळ अंधेरी पोटनिवडणुकीचंच नाही, तर शिवसेनेचं पुढचं राजकीय भवितव्य देखील ठरणाराय.