मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्येचा खूपच गाजला. आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुखांनी अयोध्येचा दौरा आखलाय. यावेळी उद्धव ठाकरे एकटे नाही तर आपल्या सर्व अर्थात १८ नवनिर्वाचित खासदारांसहीत अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे अयोध्येला भेट देणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच हा दौरा शिवसेना पक्षाध्यक्ष अधिकृतरित्या जाहीर करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकवीरा देवीच्या आणि अंबाबाईच्या दर्शनानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १५ जून रोजी अयोध्येत दाखल होणार आहेत. यावेळी, शिवसेनाप्रमुख सर्व विजयी खासदारांसह रामलल्लाचं दर्शन घेतील. पुन्हा एकदा राममंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी शंख फुंखणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय. १७ जून रोजी संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे संसद अधिवेशना अगोदरच हा कार्यक्रम आखण्यात येतोय. 



उल्लेखनीय म्हणजे, उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याची मागणी करत भाजपासमोर आव्हान उभं केलं होतं. त्यावेळी शिवसेना आणि भाजपचे संबंध अनेक दिवसांपासून ताणलेले होते. लोकसभा निवडणुकीत मात्र पुन्हा एकत्र येत या दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली... आणि त्यानंतर शिवसेनेची भाषा भाजपसाठी मात्र मवाळ झाली. इतकंच नाही तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'त आज गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ठाम विश्वास व्यक्त करत 'काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री हिंदूच असेल' असं म्हटलं गेलंय.