Fellowship: अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १५ हजारची शिष्यवृत्ती
UGC RGNF Fellowship: एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
UGC RGNF Fellowship: एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना उच्छ शिक्षणात प्रोत्साहन मिळावे यासाठी फेलोशिप देण्यात येते. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने या संधीचा लाभ घेता येत नाही.
राजीव गांधी नॅशनल फेलोशिप (RGNF) ही देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) हे पाऊल उचलले आहे.
आयोगाच्या या फेलोशिप योजनेंतर्गत 1333 अनुसूचित जातीचे विद्यार्थी आणि 667 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. ही फेलोशिप या विद्यार्थ्यांना मानवता, भाषा, सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयांतील संशोधनासाठी (पीएचडी) दिली जाते. महत्वाची बाब म्हणजे ही फेलोशिप ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी यूजीसी नेट आणि यूजीसी सीएसआयआर नेट शिवाय दिली जाते.
SC/ST विद्यार्थ्यांना दरमहा रु. 15000 ची फेलोशिप
UGC च्या राजीव गांधी नॅशनल फेलोशिप अंतर्गत, विज्ञान, ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सतील संशोधनाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये दरमहा 12,000 रुपये आणि उर्वरित कालावधीसाठी 14,000 रुपये प्रति महिना दिले जातात. तसेच अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयातील संशोधनाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये 14,000 रुपये प्रति महिना आणि उर्वरित कालावधीसाठी 15,000 रुपये प्रति महिना दिले जातात.
याशिवाय, रिसर्च स्कॉलर्सना श्रेणीनिहाय आकस्मिकता निधी देखील दिला जातो. तसेच विभागीय आणि वाचक सहाय्यासाठी अनुक्रमे 3 आणि 2 हजार रुपये दरमहा दिले जातात.
राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिपसाठी पात्रता
राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप मिळविण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी संबंधित विषयासह पदव्युत्तर शिक्षण (पीजी) करणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित विषयात पीएचडीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठात किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेत नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
UGC RGNF Application: राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया
राजीव गांधी नॅशनल फेलोशिप मिळविण्यासाठी SC आणि ST उमेदवारांनी यूजीसीने जारी केलेला नमुना पाहावा. या नमुन्यातील अर्ज भरुन त्यांच्या संबंधित विद्यापीठात किंवा संस्थेत सादर करावा लागेल. विद्यार्थ्यांना यूजीसी वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून अर्ज डाउनलोड करता येणार आहे.