इथे ओशाळली माणुसकी! मुल होत नाही म्हणून एवढं मोठं दुष्कर्म अजून कुणीही केलं नसेल...
पत्नीला मुल होत नसल्याने एका व्यक्तीने चक्क मुलीची खरेदी करुन तिच्यावर बलात्कार केला
उज्जैन : मध्यप्रदेशमधल्या उज्जैन इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आहे. पत्नीला मुल होत नसल्याने एका व्यक्तीने चक्क मुलीची खरेदी करुन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनं उज्जैनमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
तराना तालुक्यातील काठबडोदा गावचा उपसरपंच राजपाल सिंह दरबार यांच्या पत्नीला मूल होत नव्हतं. यामुळे राजपाल सिंह याने एक धक्कादायक निर्णय घेतला. त्याने चक्क नागपूरमधून एका मुलीला विकत घेतलं. तिला 16 महिने घरी ठेऊन सातत्याने तिच्यावर बलात्कार केला.
यातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तीने मुलाला जन्म दिला. पण या नंतरही नराधमाने निचपणाचा कळस गाठला. मुलाला स्वत: जवळ ठेवत पीडित मुलीला घराबाहेर हाकलुन दिलं.
6 नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली. देवास गेट पोलिसांना ही मुलगी बेवारस अवस्थेत सापडली. पोलीस स्थानकात नेऊन पीडित मुलीचा चौकशी करण्यात आली. यावेळी तीने सांगितलेल्या आपबीतीने पोलिसांच्या अंगावरही काटा आला. याप्रकरणी राजपाल सिंह दरबार याच्यासह त्याची पत्नी, कृष्णपाल सिंग आणि आणखी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी पोटावर बांधायची उशी
गावकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून राजपालची पत्नी पोटावर उशी बांधायची. तर मुलीला प्रसूतीसाठी देवास इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात पत्नीच्या नावानं नोंद करण्यात आली. मुलाचा जन्म झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी काही लोकांनी पीडित मुलीला कारमधून उज्जैनला रस्त्यावर सोडून दिलं. परत आलीस तर मारुन टाकण्याची धमकीही तिला देण्यात आली.
नागपूरमधून मुलीची खरेदी
पीडित तरुणीने आपण महाराष्ट्रातील नागपूरची असल्याचं सांगतिलं आहे. या मुलीला आई-वडिल नाहीत, फक्त एक लहान भाऊ आहे. नागपूरच्या चंदा नावाच्या एका महिलेने तिला लग्नाचं आश्वासन देऊन तिला उज्जैनला आणलं. तिचा राजपालबरोबर सौदा करण्यात आला. काही दिवस या मुलीला उज्जैनिया गावात ठेवण्यात आलं, नंतर तिला काठबडोदा गावात घेऊन जाण्यात आलं.