मोठी बातमी : यूक्रेनमध्ये अडकलेले सर्व भारतीय सुखरुप बाहेर
भारतीय नागरिकांना घरी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणांची तयारी केली जात आहे.
russia ukraine war : रशिया आणि युक्रेन मधील संघर्ष कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही देशांमध्ये चर्चेतून अजून कोणताही मार्ग निघालेला नाही. दुसरीकडे रशियाकडून यूक्रेनवर जोरदार हल्ले सुरुच आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. युद्धविरामाबाबत चर्चेत एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत चर्चा निष्फळ राहिलीये.
यूक्रेनमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, सुमीमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सांगितले आहे की, या नागरिकांना घरी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणांची तयारी केली जात आहे.
युक्रेनने दावा केलाय की, रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनच्या वाहतुकीला सुमारे $10 बिलियनचे नुकसान झाले आहे. त्यांनी खार्किवमध्ये एका रशियन मेजर जनरलची हत्या केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या चिनी विद्यार्थ्यांनी आपल्या सरकारवर टीका
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या काही चिनी नागरिकांनी चीन सरकारने त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नसल्याची टीका केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही चिनी विद्यार्थी बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेत आहेत. रशियाकडून हल्ला सुरू झाल्यानंतरच त्यांनी चिनी दूतावासाशी संपर्क साधला होता, मात्र अद्यापपर्यंत त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही.