नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर अनेकांच्याच नजरा लागतात त्या म्हणजे चारधान यात्रांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाही असंच चित्र होतं. पण, देशात आलेलं Coronavirus कोरोना व्हायरसचं संकट पाहता यंदा च्या वर्षी char dham yatra 2020 चारधाम यात्रेवरही हे सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देश लॉकडाऊन असताना आता ही परिस्थिती कुठवर कायम राहते याकडेच असंख्य भाविकांच्या आणि देशातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदीरांची कवाडं उघडली जाणं अपेक्षित आहे. 


जवळपास सहा महिन्यांसाठी चालणाऱ्या या यात्रेमध्ये गंगोत्री- यमुनोत्री धामचे द्वार २६ एप्रिलला, केदारनाथ मंदिराचे द्वार २९ एप्रिलला तर, बद्रीनाथ मंदिराचे द्वार ३० एप्रिलला उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पण, कोरोना व्हायरसमुळे असणाऱ्या या चिंताजनक परिस्थितीमध्ये कोणताही बदल न झाल्यास यंदाच्या वर्षी डिजिटल पूजा दर्शनाचा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 


'लाईव्ह हिंदुस्तान'च्या वृत्तानुसार गंगोत्री धाम समितीचे सचिव दीपक सोमवाल यांच्या म्हणण्यानुसार जर भाविकांना येथे येण्याची परवानगी मिळाली नाही, तर पूजारी परंपरेनुसार पूजाअर्चा करतील. मुळात मंदिराची कवाडं उघडण्यासाठीचा एक ठराविक वेळ आणि मुहूर्त असतो जो टाळता येत नाही. असं असलं तरीही सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करत गर्दी होऊ देणार नसल्याचं त्यांच्याकडूनन स्पष्ट करण्यात आलं. 


 


सोमवाल यांच्या म्हणण्यानुसार भाविकांना पूजेसाठीची वेळ राखून  ठेवण्यासाठीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट पाहता डिजिटल पूजेचा पर्यायय योग्य राहील. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छायाचित्र आणि व्हिडिओग्राफीला सक्त मनाई आहे. पण, पूजाअर्चा आणि कवाडं खोलण्याचे विधी ऑनलाईन पाहता येईल अशी माहिती त्यांनी दिली. तेव्हा आता येत्या काळात कोरोना व्हायरसचं सावट दूर व्हावं या प्रार्थनेसह भाविकांनीही स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन देण्यात येत आहे.