बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपात
Union Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत आर्थिक वर्ष 2024 साठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सोनं-चांदीच्या दराबाबतही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळं सोनं-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे. (Gold Price Today)
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होते. दोन महिन्यांपूर्वी सोन्यांने 75 हजारांचा पल्ला गाठला होता. त्यामुळं सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. भारतात सोन्याच्या सर्वाधिक मागणी आहे. स्त्रीधन म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. त्यामुळं लग्नसराईत किंवा एखाद्या समारंभाला सोन्याच्या खरेदी आवर्जुन केली जाते. अशातच सोन्याचे दर आभाळाला भिडत आहेत. येत्या काही दिवसांत सोनं एक लाखांवर जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना अपेक्षा होत्या.
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोनं,चांदी आणि प्लॅटिनमवर लागणाऱ्या कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कपातीनंतर मौल्यवान धातु स्वस्त होणार आहेत. सोनं आणि चांदीच्या सीमा शुल्कात 6 टक्क्यांची घट होणार आहे. तर, प्लॅटिनमच्या कस्टम ड्युटीत 6.5 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर देशात सोनं आणि इतर मौल्यवान धातुंच्या वायदे बाजारात किंमती कमी होणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्के होती. आता ही कस्टम ड्युटी 6 टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोनं जवळपास 2 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत कोसळले आहे. तर, अर्थसंकल्पाचे वाचन संपताच सोन्याच्या किंमती आणखी कोसळल्या आहेत. सोनं 1988 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कोसळल्या आहेत. सोन्यात घसरण झाल्यानंतर आता सोनं 70730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
चांदीची किंमतही बजेट संपताच कोसळल्या आहेत. 2429 रुपये प्रति किलोपर्यंत चांदीची किंमत कमी झाली आहे. चांदीची किंमत 86774 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोनं स्वस्त झाल्याने आता पुन्हा एकदा मागणीत वाढ होऊ शकते.