नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून बुधवारी शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमधील मूलतत्तवादी विचारसरणीच्या शीख व्यक्तींकडून ही संघटना चालवण्यात येते. या संघटनेशी संबंधित असणारा खलिस्तानी दहशतवादी परमजित सिंग पम्मा नुकत्याच भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होता. यानंतर मोदी सरकारने तातडीने पावले उचलत ही कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीख फॉर जस्टिसवर बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१) खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या संघटनेविरोधात १२ गुन्हे दाखल झाले असून एसएफजेशी संबंधित ३९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 


दरम्यान, भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर उभारल्या जाणाऱ्या कर्तारपूर कॉरिडोअरच्या माध्यमातूनही एसएफजे आपला अजेंडा रेटत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानकडून या संघटनेच्या कारवायांना रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. भारताकडून लवकरच कर्तारपूर कॉरिडोअरसंदर्भात होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल. 



पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंत या संघटनेचे अनेक कट उधळून लावले आहेत. एसएफजेच्या गुरपतवंत सिंग, हरमित सिंग आणि परमजित सिंग पम्मा यांच्याकडून हे कट रचण्यात आले होते. पाकिस्तानकडून त्यांना मदत होत असल्याचे काही पुरावेही समोर आले होते.