नागपट्टनम: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून आम्हीच पुन्हा सत्तेत येणार, असा दावा वारंवार केला जात आहे. मात्र, गेल्या साडेचार वर्षात भाजपबद्दल लोकांना असलेले कुतूहल पार ओसरले आहे, याचा प्रत्यय शुक्रवारी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन यांना आला. अर्थखात्याचे राज्यमंत्री असलेले पॉन राधाकृष्णन शुक्रवारी नागापट्टनमच्या अथनूर येथील आरोग्य केंद्राच्या उद्घाटनासाठी गेले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, याठिकाणी गेल्यानंतर सभेला लोक आलेच नसल्याचे राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आले. याठिकाणी केवळ २० नर्स, १० डॉक्टर आणि दोन-चार शेतकरी उपस्थित होते. यांच्या जोडीला राधाकृष्णन यांच्यासोबत १५ कार्यकर्ते होते. इतकी कमी गर्दी पाहून राधाकृष्णन यांचा पारा चांगलाच चढला. यानंतर त्यांनी तेथील सरकारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. गावातले लोक कुठे आहेत? मी सरकारी अधिकाऱ्यांसाठी या सभेला आलो आहे का?, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. 


कहर म्हणजे राधाकृष्णन यांनी लोकांची गर्दी जमल्याशिवाय व्यासपीठावर चढायलाच नकार दिला. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची आणि भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली. अखेर या सगळ्यांनी पाऊणतास धावपळ करून गावातून कसेबसे ५० लोक जमा केले. त्यानंतर राधाकृष्णन व्यासपीठावर यायला राजी झाले. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे भाजपची चांगलीच शोभा झाली.